
नाशिक । प्रतिनिधी Nashik
हिंदू हिताला प्राधान्य दिल्याशिवाय आता कोणाचेही राजकारण यशस्वी होणार नाही. यापुढे प्रत्येकाने धर्म, संस्कृती व समाजासाठी पुढाकार घेणेे गरजेचे आहे. आपल्या प्रभाव क्षेत्रात आपल्या बांधवांच्या प्रगतीसाठी किती प्रभावीपणे काम करु शकतो, किती परिवर्तन आणू शकतो, याचाच विचार करावा लागेल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले.
परांडे यांनी शहरातील बांधकाम व्यावसायिकांशी हिंदू राष्ट्रनिर्मितीमधील बांधकाम व्यावसायिकांचे महत्वपूर्ण योगदान व 2027 मध्ये नाशिक येथील आंतरराष्ट्रीय कुंभमेळ्यामधील व्यवसायाकरिता उपलब्ध होणार्या संधी, या विषयावर संवाद साधला. डॉ. कुर्तकोटी सभागृहात बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, बिल्डर, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, अभियंते, रिअल इस्टेट कन्सल्टंंट, इन्व्हेस्टर्स, वकील या क्षेत्रातील व्यावसायिकांना चर्चासत्रासाठी निमंत्रित केले होते.
क्रेडाई, नॅरेडको, एआरसी (अर्क), प्राण व बार कौन्सिल अशा संस्थांमधील सर्व पदाधिकारी व सभासद यावेळी उपस्थित होते. त्यांनी परांडे यांचा सत्कार केला.
परांडे पुढे म्हणाले, आपली व्यावसायिक प्रगती करताना माझा देश, माझा धर्म, माझा समाज ही भावना क्षीण होता कामा नये, समाज धर्म व राष्ट्राचा विचार सतत केला पाहिजे. तरच प्रगतीला काही अर्थ राहील. समाजोन्नतीचा विचार न केल्यास भविष्य अंधकारमय राहील. यावेळी माधवदास महाराज राठी यांचे भाषण झाले. राजपूत, गौरव ठाक्कर, नरेंद्र कुलकर्णी, सुरेश पाटील, समाधान गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी कंठानंद स्वामी महाराज, एकनाथ शेटे, आदींंसह पदाधिकारी उपस्थित होते. परांडे यांनी विविध शंकाचे निरसन केले. हिंदू परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष विराज लोमटे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. जिल्हा सहमंत्री कीर्तीश जोशी व अमृत सदावर्ते, प्रांत सहमंत्री हेरंब गोविलकर यावेळी उपस्थित होते.