मोहाडी येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

मोहाडी येथे कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

जानोरी | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने मोहाडी व गणेशगाव मधील सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा नसणा-या करोना बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची निर्मिती कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव सभागृह येथे करण्यात आली.

नुकतेच या कोविड सेंटरचे उद्घाटन दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या हस्ते तर सहाय्यक गटविकास अधिकारी शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुजित कोशिरे, कोरोना प्रतिबंधक निरीक्षक पी. एस. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रवीण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या विलगीकरण कक्षात 40 बेडची व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे. यामध्ये 24 तास वीज पुरवठा, फॅन कुलर, विश्रांतीसाठी बेड आरामखुर्च्या, पिण्याचे शुद्ध पाणी, गरम पाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा बरोबरच खाजगी सेवा देणारे गावातील डॉक्टर्स यांचे मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.

रुग्णांसाठी गायरान समितीकडून रोज फळांचे वाटप तर तलाठी संघटनेकडून ऑक्सीजन मशीन्स, ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सुविधांबरोबरच चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भोजनाची व्यवस्था मात्र रुग्णांच्या नातेवाइकांनी डबा पद्धतीने करायची आहे.विलगीकरण कक्षासाठी अनेकांनी आर्थिक मदत देऊ केली असून काहींनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी घेतली आहे.

कक्षात पहिल्याच दिवशी पाच रूग्णांनी प्रवेश घेतला असून इतर घरी उपचार घेत असणा-या बाधीतांनी स्वयंस्फूर्तीने दाखल व्हावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. योगेश देशमुख, डॉ. कल्पेश चोपडे, मंडलाधिकारी विधाते, माध्यमिक चे मुख्याध्यापक एस.व्ही. खुर्दळ,तलाठी गायकर,ग्रामसेवक चौधरी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी, उपसरपंच बाबासाहेब निकम रवींद्र जाधव, निवृत्ती क्षिरसागर, कैलास कळमकर, संजय बोढाई उपस्थित होते.

मोहाडी: विलगीकरण कक्ष उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक अनंत तारगे,सहाय्यक गट विकास अधिकारी शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोशिरे, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रवीण जाधव, डाॅ. चंद्रकांत पाटील आदी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com