खरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषी अधिकारी बांधावर

खरीप हंगाम यशस्वीतेसाठी कृषी अधिकारी बांधावर

मालेगाव । प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची तयारी सुरू केली आहे. खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी मालेगावसह सटाणा व नांदगाव तालुक्यात गावपातळीवर खत, बियाणे विक्रेते तसेच शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. शेतातील बांधावर जाऊन कृषी अधिकारी शेतकर्‍यांची भेट घेत संवाद साधत असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी दिली.

खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना विविध माध्यमातून शेतीसंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व सेवक शेतकर्‍यांशी थेट संपर्क करून विभागाच्या विविध मोहिमा व योजनांची माहिती देत आहेत. करोना प्रादुर्भावामुळे समाज माध्यमांच्या मदतीने ऑनलाईन बैठका घेऊन खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी मालेगाव उपविभागातील मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुकास्तरावरून शेतकरी, खते बियाणे विक्रेते यांना माहिती देण्यात येत आहे. गावपातळीवर विशेष मोहिमेद्वारे कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी तालुक्यातील देवारपाडे, झोडगे येथे भेटी देऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

झोडगे येथील पुष्पाबाई शिरोडे यांच्या शेत शिवारात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेततळे कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी पाच किलोमीटर परिसरातील 15 मजूर कामावर उपस्थित होते. कामाच्या शुभारंभवेळी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण शिंदे, जाधव, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

कृषी विभागाकडून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग व शेततळ्यांमुळे आज त्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले असून फळांचे उत्पादन आंबा, शेवगा मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे कंधाणे येथील प्रकाश गांगुर्डे या शेतकर्‍याने सांगितले.

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून देवारपाडे येथे बांधावर खत वाटप मोहिमेत आदित्य कृषी एजन्सी या विक्रेत्यामार्फत शेतकर्‍यांच्या बांधावरच इ-पॉस मशीन उपलब्ध करून 23 शेतकर्‍यांना 10 टन खत वाटप करण्यात आले. तसेच दहा टक्के खताची बचत व्हावी म्हणून द्रवरूप जैविक खत अनुदानावर वाटप यावेळी करण्यात आल्याचे कृषी अधिकारी देवरे यांनी सांगितले. मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com