आरटीई प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना मिळणार

पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये
आरटीई प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना मिळणार

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्‍या प्रादुर्भावामुळे शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांच्‍या प्रवेशाची प्रक्रियाही रखडली आहे. लॉकडाउननंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिली जाईल. पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, अशी सूचना शिक्षण विभागाने जारी केली आहे.

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेलाही उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्‍यानंतर गेल्‍या ७ एप्रिलला प्रवेशासाठी सोडत काढण्यात आली. सलग शासकीय सुट्या आल्‍याने १५ एप्रिलपासून पालकांना एसएमएस प्राप्त होण्यास सुरवात होईल, असेही कळविले होते.

परंतु, याचदरम्यान करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्‍याने गत वर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेशाची प्रक्रिया ढासळली आहे. पालकांकडून वारंवार चौकशी होत असल्‍याने शिक्षण विभागाने सूचना जारी केली आहे. त्‍यानुसार लॉकडाऊउननंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना दिली जाणार आहे. सद्यःपरिस्‍थिती लक्षात घेता पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असे आवाहनही केले आहे.

लाखाे पालकांचे लक्ष

राज्‍यातील नऊ हजार ४३२ शाळांनी प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा उपलब्‍ध करून दिल्‍या. अर्ज प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्‍याने दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले होते, तर सोडतीत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड पुढील प्रक्रियेसाठी केली होती. नाशिक जिल्ह्यात साडेचारशे शाळांनी नोंदणी केली असून, प्रवेशासाठी चार हजार ५४४ जागा उपलब्‍ध आहेत. १३ हजार ३३० अर्ज प्राप्त झाले असून, चार हजार २०८ विद्यार्थ्यांची नावे सोडतीत निवडली आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com