आठवडे बाजारात महागाईचा कळस

आठवडे बाजारात महागाईचा कळस

निफाड । प्रतिनिधी Niphad

परतीच्या पावसाने भाजीपाल्याचे (Vegetable) मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने व यातून जे थोडेफार वाचले त्या भाजीपाल्याला आता लाखमोलाचा भाव आला आहे. मात्र असे असतांनाही शेतकर्‍यांनी (farmer) भाजीपाला पिकावर ज्या प्रमाणात खर्च केला त्या प्रमाणात उत्पादन निघत नसल्याने वाढत्या महागाईचा (Inflation) फायदा शेतकर्‍यांना होत नाही. मात्र या महागाईची झळ सर्वसामान्य शेतमजूरांना मोठ्या प्रमाणात बसतांना दिसत आहे.

गेले दोन वर्ष करोना (corona) प्रादूर्भावात गेले तर आता परिस्थिती पूर्वपदावर येत असतांनाच पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे शेतमजूरांसह सर्वसामान्यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी गवार 40 रु. किलोने विक्री होत असतांना आज मात्र गवार 120 रु. किलोने विक्री होत आहे. तर टोमॅटो 40 रु. किलो, हिरवी मिरची 80 रु., कोबी 30 रु. गड्डा, फ्लावर 30 रु. गड्डा, गाजर 40 रु. किलो, वांगे 80 रु. किलो, शेवगा 80 रुपये, मेथी 20 रु. जुडी,

शेपू 20 रु. जुडी, कांदापात 30 रु. जुडी, कोथंबिर 10 रु. जुडी, बटाटे 25 रु. किलो, कारले 120 रु. किलो, कांदा 40 रु. किलो, भेंडी 80 रु. किलो, सिमला मिरची 80 रु. किलो, गिलके 40 रु. किलो, डांगर 30 रु. किलो, दोडके 60 रु. किलो, वटाणा 40 रु. किलो, पालक 10 रु. जुडी, ऊसळ 20 रु., लसूण 160 रु. किलो याबरोबरच वाल, चवळी, डिंगरी, भोपळा, मुळा आदी भाजीपाला देखील ‘मुंह मांगे दाम’ भावाने विक्री होत आहे.

बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटल्याने व मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भावात वाढ झाली आहे. ऑक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या काळात शेतकर्‍यांनी लावलेल्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र यातून जे पीक वाचले त्यावर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र हा खर्च करून देखील उत्पादनात मोठी घट झाली.

त्यामुळे पालेभाज्या (Leafy vegetables) व फळभाज्यांचे भाव वाढत असतांनाच आता पुन्हा ओमायक्रॉनचे (omicron) संकट घोंगावू लागल्याने जिल्ह्यात संचारबंदी (Curfew) होण्याचे संंकेत मिळू लागले आहे. परिणामी त्याचा थेट परिणाम आताच बाजारपेठांवर होवू लागला आहे. साहजिकच आगामी काळात जिवनावश्यक वस्तुंचे दर देखील आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला या महागाईची झळ सहन करावी लागत आहे.

सोशल डिस्टन्सचा फज्जा

निफाड ही तालुक्याची बाजारपेठ असून येथे दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. मात्र सध्या ओमायक्रॉनचा वाढता धोका विचारात घेता शासनाने आठवडे बाजार व शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला असून लग्न समारंभ, अंत्यविधी यासह इतर कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहे. मात्र काल निफाडच्या बाजारपेठेत गर्दीचा माहोल दिसून आला.

अनेकजण विनामास्क फिरतांना दिसले. तसेच नगरपंचायतीने आवाहन करून देखील अनेकांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे वाढती गर्दी ही करोना वाढीला कारणीभूत ठरू लागली असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. तसेच नगरपंचायतीने देखील यावर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com