म्हेळुस्केला निकृष्ट प्रतीचा पोषण आहार

म्हेळुस्केला निकृष्ट प्रतीचा पोषण आहार

म्हेळुस्के । वार्ताहर

म्हेळुस्के (ता. दिंडोरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निकृष्ट प्रतीचा पोषण आहार आल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शारीरिक बाधा होऊ नये या करीता सरपंच, उपसरपंच यांच्या आदेशानुसार तो पोषण आहार परत केला असून संबंधित विभागाकडून नव्याने व चांगल्या प्रतीचा पोषण आहार उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

शासन राबवत असलेल्या योजना त्यात प्रामुख्याने गणवेश, वह्या-पुस्तके, पोषण आहार, वेगवेगळे कडधान्य विद्यार्थ्यांना मोफत देऊन त्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाबरोबरच त्यांची शालेय गुणवत्ता कशी वाढेल याचा विचार करताना लाखो रुपये खर्च करत आहे. परंतु या योजना राबवत असताना कुठेतरी या प्रक्रियेमध्ये अनियमितता आढळून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. असले प्रकार निंदनीय असल्याचे उघड होत आहे.

म्हेळुस्के जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रामुख्याने तूरडाळ, तांदूळ व मूग या पोषण आहाराचा साठा संबंधित कंत्राटदाराकडून पोहोच करण्यात आला. त्यावेळेस तो साठा ताब्यात घेण्याअगोदर सरपंच योगिता बर्डे, उपसरपंच योगेश बर्डे यांनी त्या आहाराची प्रत तपासली असता त्यात तांदूळ आणि तूरडाळ व्यवस्थित असल्याचे दिसून आले.

परंतु मूग निकृष्ट प्रतीचे असल्याचे लक्षात आल्याने मुख्याध्यापक दीपक खैरनार यांना मूग उतरवून न घेता परत करण्यास सांगितले. त्याचबरोबर उपसरपंच योगेश बर्डे यांनी भ्रमनध्वनीवरून संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही मूग निकृष्ट दर्जाचा असेल तर परत करावा व लवकरच नव्याने चांगल्या प्रतीचा मूग उपलब्ध करून देण्याचे मान्यही केले.

शासन राबवत असलेल्या योजना नक्कीच प्रशंसनीय आहेत. परंतु बर्‍याचदा पडद्याआड होणार्‍या देवाण-घेवाणीमुळे या योजनांना गालबोट लागते. शासनाने याबाबत कडक धोरण राबवून अशा प्रवृत्तींना पायबंद घातला पाहिजे.

योगिता बर्डे, सरपंच, म्हेळुस्के

पोषण आहार आम्ही तपासल्यानंतर त्यात जो निकृष्ट वाटला तो आम्ही परत केला; परंतु ज्या वाहनातून तो आहार पुरवठा केला गेला त्यांनी इतरही गावांत तोच पोषण आहार वाटप केला. पोषण आहाराची प्रत तपासल्याशिवाय आहार ताब्यात घेऊ नका, जेणेकरून बालकांना काही शारीरिक बाधा होणार नाही.

योगेश बर्डे, उपसरपंच, म्हेळुस्के

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com