अंगणवाडी सेविकांकडून निकृष्ट हॅन्डसेट परत

अंगणवाडी सेविकांकडून निकृष्ट हॅन्डसेट परत

पोषण ट्रॅकर अ‍ॅप बदलून देण्याची मागणी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

शासनाने अंगणवाडी सेविकांना ( Anganwadi workers) दिलेले मोबाइल फोन ( Mobile phones ) हे निकृष्ट दर्जाचे असून ते वापरण्यास अंगणवाडी सेविकांना त्रास होत आहे. त्यातील पोषण ट्रॅकर अ‍ॅप (Poshan Tracker App ) हे इंग्रजी भाषेत असल्याने अंगणवाडी सेविकांना ते समजत नाही. त्यामुळे ते मोबाइल परत घ्यावेत, या मागणीसाठी तालुक्यातील 525 अंगणवाडी व आशासेविकांनी आपले मोबाइल शासनाला परत करत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकार्‍यांना निवेदन दिले.

सुमारे दोन वर्षांपूर्वी दिलेले हे मोबाइल त्रासदायक ठरू लागल्याने तालुक्यातील अंगणवाडी व आशा सेविका 525 मोबाइल हँडसेट घेऊन पंचायत समितीतील बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांच्या कार्यालयात आल्या. मोबाईल जमा करून घेण्यास अधिकार्‍यांनी टाळाटाळ केल्यानंतर महिलांनी एक बॉक्समध्ये आपापल्या बिटचे मोबाईल टाकून ते बॉक्स अधिकार्‍यांकडे जमा केले.

दुरुस्तीसाठी भुर्दंड

सरकारी कामासाठी देण्यात आलेल्या या मोबाइलची दोन वर्षे मुदत होती, ती संपली आहे. मोबाइल अवघ्या दोन जीबी रॅमचा आहे. त्या तुलनेत लाभार्थ्यांची भरायची माहिती खूप जास्त आहे. यामुळे मोबाइल हँग होतात. लवकर गरम होतात. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे मोबाइल असून दुरुस्तीसाठी तीन ते चार हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च अंगणवाडी सेविकांकडून घेतला जात आहे.

अ‍ॅप डाऊनलोड होईना

लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अ‍ॅप दिले आहे. मात्र, सरकारने दिलेल्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खासगी मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करावे लागत आहे. हे अ‍ॅप इंग्रजीमध्ये असल्याने ते हाताळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे हे अ‍ॅप मराठीत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com