
नाशिक । नरेंद्र जोशी Nashik
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकदा मातांकडून बालकांना शास्त्रीय पद्धतीने स्तनपान केले जात नसल्याने बालके कुपोषित राहतात. या समस्येवर मात करण्यासाठी तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांद्वारे गरोदर आणि नवजात मातांना प्रशिक्षित करण्यात येत होते. फिडिंग तंत्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या उपक्रमासाठी आयआयटी बॉम्बेच्या तंत्रज्ञांचीही प्रशिक्षणासाठी मदत घेण्यात आली. तीन महिन्यांनंतर या उपक्रमामुळे तब्बल दोनशेपेक्षा अधिक बालकांच्या वजनात सरासरी दोन किलोंपेक्षा जास्त वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या एक ऑगस्टपासून जिल्ह्यात स्तनपान सप्ताह राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर ही आशादायक चित्र समोर आल्याने या मोहिमेच्या अंमलबजावणीवर पुढच्या टप्प्यात भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या संपविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व स्तनदा मातांना स्तनपानाबाबत प्रशिक्षण अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या 300 कर्मचार्यांना शिक्षण देण्यात आले होते.
तीन महिन्यांच्या कालावधीत बाळाला योग्य पद्धतीने मातेचे दूध मिळाल्यामुळे दोनशेहून अधिक बालकांच्या प्रकृती व वजनात सुधारणा दिसून आली. या मुलांच्या रोगप्रतिकारक क्षमतेतही वाढ झाली. बालकाचे वजन सरासरी दोन किलोपर्यंत वाढले. मार्च 2023 मध्ये जिल्ह्यात 1535 मध्यम तीव्र कुपोषित बालके होती. 183 तीव्र कुपोषित बालके होती. या उपक्रमाने आगामी काळात कुपोषित बालकांची संख्या घटण्याची आशा निर्माण झाली आहे.
लाखात चाळीस कुपोषित
मातेच्या दुधाला अमृताचा दर्जा दिला जातो. हेे दूध बाळाचे रोगापासून संरक्षण तर करतेच, पण सोबत बाळाचा शारीरिक आणि बौद्धिक विकासही करते. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर मातेने शक्य तितक्या लवकर स्तनपान करावे, असे वैद्य सांगतात. दुर्दैवाने े आजही लाखांत 40 बालकांचे मातेच्या दुधातून वर्षभर पोषणच होत नाही. त्यामुळे ही बालके कुपोषित राहतात.
35 लाख रुपये खर्च
नाशिक जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या अधिक असलेल्या भागात कर्मचार्यांना शास्त्रशुद्ध स्तनपानाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून स्तनदा माता यांनाही शास्त्रशुद्ध पद्धतीने स्तनपान कसे करावे, याबाबत जिल्ह्यातील अडीच हजार कर्मचार्यांना शास्त्रशुद्ध स्तनपान प्रशिक्षण दिले. स्तनपानाचे कीट पुरविले आहे. यासाठी साधारणपणे 35 लाख रुपये खर्च होत आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीस, सेविका, पर्यवेक्षिका, प्रकल्प अधिकारी यांच्यातून कर्मचार्यांची निवड केली आहे.