भारतीय चलन निर्मिती हीच नाशिकची ओळख : खा. गोडसे

भारतीय चलन निर्मिती हीच नाशिकची ओळख : खा. गोडसे

ना.रोड । प्रतिनिधी Nashikroad

भारतीय चलनी नोटांची छपाई (Printing of Indian currency notes) नाशिकरोडच्या ( Nashikroad ) प्रेसमध्ये होते. आपले चलन ही आपली ओळख आहे. आता ई पासपोर्टही नाशिकरोडच्या आयएसपीप्रेसमध्ये छापला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे मोठे यश आहे. स्वातंत्र्याचा शतकी महोत्सव साजरा होईल तेव्हा भारतीय चलन आणि पासपोर्ट जगात नंबर एकवर असेल, असा विश्वास खा. हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

भारतीय चलनी नोटांचा अठराव्या शतकापासून ते आजपर्यंतच्या वाटचालीची ऐंतिहासिक माहिती देणारे, ज्ञानात मोलाची भर घालणारे प्रदर्शन नाशिकरोडच्या नोट प्रेससमोरील काचेच्या आर अ‍ॅन्ड डी इमारतीत सुरु झाले. हे प्रदर्शन 9 आणि 10 जूनला नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहे. तथापी, प्रत्येकाने आधारकार्ड दाखवणे आवश्यक आहे. प्रत्येक नाशिककराने आवर्जून भेट द्यावे असे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन केल्यानंतर खा. गोडसे बोलत होते.

नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती पात्रा घोष, नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, विनयकुमार सिंग, बी.के. आनंद, मजूदर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बनायत, प्राप्तीकरचे सहआयुक्त शैलेंद्र राजपूत, अमितकुमार सिंग, बीएसएनलचे नितीन महाजन, एच. एस ठाकूर, जीएसटीचे प्रविण पांडे, आयबीचे अमित मोती, एस. पी. वर्मा, प्रेस मजदूर संघाचे उपाध्यक्ष जयराम कोठुळे, संतोष कटाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खा. गोडसे म्हणाले की, नोंटबंदीच्या काळात प्रेस कामगारांनी रात्रंदिवस काम करुन देशसेवा केली. नोट प्रेसचे आधुनिकीकरण झाले. आयएसपी प्रेसचे 1985 पासून आधुनिकीकरण नाही, ते व्हावे. तृप्ती घोष म्हणाल्या की, प्रेसमधील नोट छपाई रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच चालते.

भारतीय चलनांचा प्रवास रोमांचकारी आहे. त्याची माहिती देणारे हे प्रदर्शन उल्लेखनीय आहे. नोटबंदी काळात रात्रंदिवस काम करून नाशिकरोड प्रेसच्या कामगारांनी आपला दर्ज सिध्द केला आहे. नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू म्हणाले की, चलन हे एक माध्यम तसेच विनिमयाचे साधन आहे. 1928 पासून नाशिकरोडच्या प्रेसमध्ये नोटांची छपाई सुरु झाली. आताही सुरु आहे. या ऐतिहासिक प्रवासाचे आम्ही एक भाग आहोत याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी नमूद केले.

खोट्या नोटा कशा ओळखाव्यात याची माहिती देणारा विभाग प्रदर्शनात आहे. नोटांच्या इतिहासाचा माहितीपट येथे दाखवला जातो. इंग्लडमध्ये भारतीय नोटांची छपाई सुरु झाली तेव्हापासून भारत याबाबतीत स्वयंपूर्ण कसा झाला या वाटचालीची अभिमानास्पद माहिती देणारा कक्षही आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com