इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेला सुरवात

मनपाचा नाशिक झिलर्स संघ; कर्णधारपदी अभिनेता उदगीरकर
इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेला सुरवात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान 'स्वच्छ अमृत महोत्सव' (Swachha Amrit Mahotsav)हा विशेष उपक्रम देशभरातील शहरांमध्ये राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेला देशभरात सुुरूवात करण्यात आली. पर्यटनस्थळे, समुद्र किनारे तसेच डोंगरांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमात नाशिक मनपाचा नाशिक झिलर्स हा संघ सहभागी झाला आहे. या संघाचा कर्णधार प्रसिध्द अभिनेता चिन्मय उदगीरकर असून दादासाहेब फाळके स्मारकातील सभागृहामध्ये आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिकरोड आर्टिलरी सेंटरच्या पाईप्स अँड ट्रम्प बँड पथकाने सुभेदार मेजर बसवराज वगे यांच्या मार्गदर्शनाखाली वादन झाले. केंद्र सरकारने प्रसारित केलेले एक और कदम स्वच्छता की और हे गाणेही यावेळी ऐकवण्यात आले. मोहिमेला सहकार्य करणार्‍या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमींचा सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, नाशिक प्लॉगर्सचा तेजस तळवरे, रोट्रॅक्ट क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीचे स्वानंद गोर्‍हे, पर्यावरण प्रेमी चंद्रकांत पाटील, मनोज साठे, सुरेश शिरोडे, रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित, स्मार्ट सिटीचे निलेश बढे, के. के. वाघ कॉलेजचा विद्यार्थी ओम कासार, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटची ओजस्वी मनवती आणि कलर्स मराठी वाहिनीचे निर्माते संजय झणकर यांचा सत्कार करण्यात आला.

आपल्या सुंदर नाशिक शहराची स्वच्छतेच्याबाबतही देशात ओळख निर्माण करून देण्याची मोठी संधी या स्पर्धेच्या निमित्ताने आहे, असे चिन्मयने आपल्या मनोगतामधून तरुणाईला साद घातली. ही टीम पूर्ण नाशिकची असून सर्व नाशिककर याचे कर्णधार असल्याचे सांगितले. आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात करावी. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, केवळ स्पर्धेसाठी स्वच्छता न करता त्यात कायम सातत्य ठेवले पाहिजे, असे आवाहन डॉ. भारती पवार यांनी केले.

स्वच्छ सर्व्हेक्षण आणि प्रदूषण रोखण्याचा मनपाचा उपक्रम आहे, इंडियन स्वच्छता लीगमध्ये लोकसहभाग महत्वाचा असल्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सांगत नाशिक मुळात स्वच्छ आहे. नागरिक जागरूक आहेत. या स्पर्धेत शहरातील सामाजिक संस्था आणि युवा वर्गाने मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. केंद्र सरकारने निर्देश दिलेल्या ठिकाणावर आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या पथकाने सतत आढावा घ्यावा, अशी सूचनाही केली. नाशिक झिलर्सचे झेंडे उंचावत महाविद्यालयीन तरुणांनी यावेळी जल्लोष केला.

कार्यक्रमानंतर डॉ. भारती पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त विजयकुमार मुंडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी सूत्रसंचालन केले.

चामरलेणी येथे स्वच्छता

म्हसरूळ येथील सिद्धक्षेत्र गजपंथ चामरलेणी येथेही आज विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. नामको कॉलेजचे 25 विद्यार्थी, हर्षल इंगळे मित्र परिवार यांचे 20 स्वयंसेवक, कपिला बचाव मंचचे योगेश बर्वे, स्वछता निरीक्षक दुर्गदास मालेकर आणि 41 स्वच्छता सेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com