करोना रुग्णांची धावपळ कमी करणारे स्टार्टअप

चिन्मयी आणि आरिफ यांची निर्मिती
करोना रुग्णांची धावपळ कमी करणारे स्टार्टअप

नाशिक । प्रतिनिधी

आजची तरुणाई टेक्नोसेव्ही आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून करोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि सामान्यांची धावपळ कमी करता येऊ शकेल का? करोना संदर्भातील सगळी अत्यावश्यक माहिती एका क्लिकवर त्यांना उपलब्ध करून देता येईल का, असा विचार आम्ही केला. माझ्या बाबतीत घडलेल्या एक वैयक्तिक दुःखद प्रसंगानेही प्रेरणा दिली आणि आम्ही ‘इंडिया क्रिटिकल रिसोर्स नेटवर्क’ हे स्टार्टअप सुरू केले. त्याअंतर्गत मी आणि माझे पार्टनर आरिफ अमीरानी यांनी covidpune.com/reach ही वेबसाईट सुरू केली, अशी माहिती या स्टार्टअपच्या निर्मात्या चिन्मयी डुंबरे यांनी ‘देशदूत’ला दिली...

Q

ही वेबसाईट कोणत्या प्रकारची माहिती देते?

A

ही वेबसाईट मार्च महिन्याच्या शेवटी सुरू झाली. करोना रुग्णालये, उपलब्ध खाटा, प्राणवायूची आणि जीवरक्षक प्रणालीची (व्हेंटिलेटर) सुविधा, प्लाझ्मा, रुग्णवाहिका, तिच्या चालकांचे नंबर्स, अत्यावश्यक कागदपत्रे अशी सगळी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. ही माहिती सतत अद्ययावत ठेवली जाते. आतापर्यंत सुमारे 18 लाखांपेक्षा जास्त लोकांना या वेबसाईटचा उपयोग झाला आहे.

Q

हे स्टार्टअप का सुरू करावेसे वाटले?

A

करोनाची पहिली लाट आली तेव्हापासूनच वैयक्तिक पातळीवर आम्ही आमचे मित्र, नातेवाईक यांना मदत करत होतो. आम्ही दोघे टेक्नॉलॉजी फिल्डमधले आहोत. त्याचा फायदा करोनासंदर्भात सामान्य लोकांना करून देता येईल का, असा विचार मनात येत होता. त्याच दरम्यान माझे वडील सदा डुंबरे करोनाने गेले. त्यांना संसर्ग झाला तेव्हापासून मी आणि माझे काही मित्र यांची खूपच धावपळ झाली. तेव्हा काय करावे काहीच कळत नव्हते. फार भयंकर काळ होता तो. तेव्हा जाणवले अशी वेळ कितीतरी जणांवर येत असेल. ज्यांचे कोणतेही सोर्स नाहीत ते कुठे जात असतील, त्यांची किती वणवण होत असेल?

माहिती उपलब्ध होती पण..

साथीच्या सुरुवातीच्या काळातही काही हेल्पलाईन सुरू झाल्या होत्या. शासकीय स्तरावर देखील माहिती उपलब्ध होती. पण तेव्हा विविध स्तरावर उपलब्ध असलेली माहिती विखुरलेली आणि खूप क्लिष्ट होती असे लक्षात आले. ती माहिती सामान्य माणसांना पटकन समजणारी नव्हती. आणि खरे सांगू का ज्याच्यावर परिस्थिती येते ना तेव्हा ती वेळ माहिती समजून घ्यायची नसते आणि त्या व्यक्तीची तशी मानसिकताही नसते. त्यामुळे करोना संदर्भातील कोणतीही माहिती पटकन उपलब्ध होईल आणि सामान्यांना ती सहज कळेल अशी असावी असे वाटले. ती उणीव आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून भरून काढायचा प्रयत्न केला आहे. ‘कोविड पुणे’ या वेबसाईटला दर मिनिटाला 300-400 लोक भेट देतात. त्यावरूनच याची उपयुक्तता लक्षात येते.

Q

ही सुविधा कोणत्या कोणत्या शहरात उपलब्ध आहे?

A

आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तमिळनाडू, पश्चिमबंगाल, तेलंगणा आणि पुणे, नाशिक, नागपूर, सुरत, दिल्ली, राजकोट, गांधीनगर, बीड, अहमदाबाद, वडोदरा आणि बंगळुरू.

Q

करोना मदतकार्यात तरुणाईच्या पुढाकाराविषयी काय सांगाल?

A

तरुणाई स्वेच्छेने पुढाकार घेत आहे. परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच कन्स्ट्रक्टिव्ह आणि ट्रान्स्परन्ट आहे. या परिस्थितीचा कोणताही फायदा तरुणाईला करून घ्यायचा नाही आहे.

Q

करोनामुळे आपले स्वकीय गमावण्याची दुर्दैवी वेळ खूप जणांवर आली आहे. तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडून हा उपक्रम कसा सुरू केला?

A

खूप अवघड होते, त्या प्रसंगातून बाहेर पडणे. त्या काळात माझ्या वडिलांचे विचार माझे मार्गदर्शक ठरले. समाजातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत होती. साथ वाढतच होती. माझे वडील म्हणायचे, स्वतःचे दुःख किती काळ धरून बसायचे? दुःखाच्या प्रसंगी दुसर्‍याची मदत केली तर माणूस त्याच्या दुःखातून लवकर बाहेर पडतो. तेच आम्ही केले. शिवाय वेबसाईट हजारो लोकांची मदत करत आहे. खूप अडचणीच्या काळात त्यांच्या उपयोगी पडत आहे. ही भावनाही प्रेरणा देते. आम्हाला मिळणारे प्रतिसादही आमचा उत्साह वाढवणारेच आहेत. आता आम्ही असे काम करणार्‍या विविध ग्रुप्सना एकत्र आणायच्या विचारात आहोत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com