नाशिक । Nashik
करोनाचा धोका अद्याप टळला नसताना रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणांवर थुंकणारांचे प्रमाण वाढले आहे. संसर्गजन्य आजार कायद्यान्वये शासनाने थुंकण्यास केलेली मनाई व कारवाईबाबात दिलेले आदेशांचाही सर्व यंत्रणांना विसर पडल्याचे शहरात चित्र आहे.
करोना संसर्गजन्य आजार असल्याने तसेच तो प्रामुख्याने घशासी निगडीत असून करोनाबाधीत व्यक्तीची शिंग अगर थुंकीच्या संपर्कात कोणी आल्यास त्यालाही कोरोनाचा संसर्ग होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. सार्वजिक ठिकाणे, रस्ते अशा ठिकाणांवर थुंकणे इतरांसाठी धोकादायक असते.
म्हणुन कोवीड 19 संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आदेशांमध्ये मास्कचा सक्तीने वापर, हातांची सातत्याने साबणाने स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळणे अशा नियमांबरोबरच सार्वजिक ठिकाणी थुंकणे टाळा असा नियम घालून देण्यात आला आहे.
सार्वजिक ठिकाणी थुंकणार्यांवर कारवाई करण्याचे आदेशही शासनाने दिले होते. याची अंमल बजावणी नाशिक महानगर पालिकेने सुरू केली होती. यासाठी आरोग्य विभागाची काही पथकेही नेमण्यात आली होती. मात्र बोटावर मोजण्याइतक्या कारवाई सोडल्या तर यामध्ये पुढे काहीच झालेले नाही. पोलीसांनीही पुढाकार घेऊन काही गुन्हे दाखल केले मात्र इतर गुन्हेगारी व कामांमुळे पोलीसांचेही दुर्लक्ष झाले.
सध्या करोनाचे संपल्याची भावना सर्वांमध्ये असून शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवले जात आहे. प्रामुख्याने दिवाळीमध्ये नागरीकांनी सामाजिक अंतराचा फज्जा उडवल्याचे चित्र होते. मास्कचा वापर कवचीत होत होता. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे दिसत आहे.
सार्वजनिक ठिकाणी पिंक मारणार्यामध्ये सर्वाधिक प्रमाण तंबाखु खाणारांचे आहे. यानंतर गुटखा, त्या खालोखाल पान खाऊन थुंकणारांचे प्रमाण मोठे आहे. राज्यात बंदी असतानाही त्यांना गुटखा शहरात सहज उपलब्ध होत असल्याने हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे.
परंतु सार्वजिक ठिकाणी थुंकणे इतर नागरीकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून यामुळे करोना अधिक पसरण्याचीच शक्यता असून आता तरी महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणारांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.