
नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या गट-गण ( Zilla Parishad Groups ) रचनांचे प्रारूप आराखडे तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुकानिहाय गट व गणांची संख्याही 2011 च्या जनगणनेनुसार निश्चित केली आहे.
यानुसार नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत 11 जागा वाढून आता गटांची संख्या 84 तर गणांची संख्या 168 झाली आहे.निफाड, देवळा, नांदगाव, येवला व इगतपुरी या पाच तालुक्यांत मात्र एकही गट वाढला नसून, उर्वरित दहा तालुक्यांमध्ये मालेगाव वगळता प्रत्येकी एक गट वाढला आहे. मालेगाव तालुक्यात दोन गट वाढल्याने तेथील गटांची संख्या नऊ झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission )गट व गण रचनेचे प्रारूप आराखडे तयार करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना पाठवलेल्या पत्रानुसार राज्य सरकारने गत महिन्यात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या निश्चित केलेल्या गटांच्या संख्येनुसार रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात 84 गटांचे व 168 गणांचे प्रारूप आराखडे तयार केले जाणार आहेत. या प्रारूप आराखड्यांसाठी नाशिक जिल्ह्याची 2011 च्या जनगणनेची लोकसंख्या आधारभूत मानली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्या 24 लाख 78 हजार 168 असून, त्यानुसार 28 ते 30 हजार लोकसंख्येचा एक गट करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील गटांची संख्या 84 झाल्यामुळे आता दहा तालुक्यांमधील गटांची संख्या 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत एक-एक ने वाढली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक तालुक्यातील गट व गणांची संख्याही जिल्हाधिकार्यांना कळवली आहे. या पत्रानुसार नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, बागलाण, कळवण, सुरगाणा या तालुक्यांमधील गटांची संख्या 2017 च्या तुलनेत प्रत्येकी एकने व मालेगाव तालुक्यातील गटांची संख्या सातवरून नऊ झाली आहे. सर्वाधिक 10 गट असलेल्या निफाड तालुक्यात ओझर गट रद्द झाल्याने नव्याने गट तयार होईल, अशी चर्चा होती. मात्र, या तालुक्यातील गट संख्या दहाच राहिली आहे. तसेच येवला, नांदगाव, इगतपुरी, देवळा या तालुक्यांमधील गटांची संख्या ’जैसे थे’ राहिली आहे.