सातपूर । प्रतिनिधी Satpur

राज्य व केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालीमुळे अल्प दरातील इंधन महाग होऊ लागले आहे. त्याचा परिणाम केवळ वाहनचालकांवरच नव्हेतर मालवाहतूकदारांवरही होत असल्याने पर्यायाने महागाईला निमंत्रण ठरत आहे. शासनाने इंधनावरील अधिभार कमी करुन नागरीकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजातील सर्वच स्तरावरुन उमटत आहे.

पुर्वी इंधन दरवाढ बजेटच्या काळात मोठ्या प्रमाणात केली जात होती. मात्र ती वर्षभरासाठी स्थिर होती. शासनाने रोजच्या दर बदलातून अल्प दरवाढ करुन नागरीकांना महागड्या दरात इंधन घेण्यास भाग पाडले आहे. रोज दरवाढ होत असल्याने इंधन दरवाढ कमालीची वाढल्याचे चित्र आहे. क्रुड ऑईलच्या दरात शासनाच्या करप्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत.

प्रत्यक्षात मे 2013 मध्ये क्रुड ऑईलचे दर 99.33 डॉलर प्रती बॅरल होते. त्याच वेळी पेट्रोलचे दर हे 71.13 रुपये होते. तर डिझलचे दर हे 54.59 रुपये एवढे होते. डिसेंबर 2015 मध्ये क्रुड ऑईलचे दर हे 36.57 डॉलर प्रती बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल 67.04 तर डिझेल 59.86 रुपये होते. डिसेंबर 2018 मध्ये हेच दर 53.96 डॉलर प्रती बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल 74.47 तर डिझल 66.79 रुपये होते. डिसेंबर 2020मध्ये क्रुड ऑईलचे दर 47.58 डॉलर प्रती बॅरल होते. त्यावेळी पेट्रोल 90.34 रु.तर डिझेल 80.51 रुपये होते.

केंद्र व राज्य सरकारने कर कमी करावे. याशिवाय या व्यवसायाला गती मिळणे कठीण होत आहे. कोविडमुळे आधीच धंदे 30 टक्कांवर आले होते. त्यानंतर सातत्याने दरवाढीच्या झटक्यामुळे व्यवसाय उभारीला वावच राहिलेला नाही. दिवसेंदिवस मागणी कमी होत आहे.

भूषण भोसले, अध्यक्ष जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन

पुर्वी आम्ही मोटर सायकलमध्ये लिटरच्या प्रमाणात इंधन भरायचो. दररोजच्या बदलत्या दरांमुळे आता 100 रुपयांच्या पटीत इंधन घेतले जाते. बर्याच वेळा वाहनातून इंधन चोरी होण्याच्या भितीमुळे कमीच इंधन भरत असतो. यावर शासनाने उपाय करावे. आता कामावर वाहन नेणे कठीण होऊ लागलेले आहे.

रवींद्र उगले, कामगार