म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन पुरवठा वाढवा : खा. गोडसे

म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शन पुरवठा वाढवा : खा. गोडसे

देवळाली कॅम्प । वार्ताहर

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. या आजाराने बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. यासाठी जिल्ह्यातील रुग्णांसाठी अँम्फोटेरिसिन इंजेक्शनचा साठा तातडीने वाढविण्याची मागणी खा. हेमंत गोडसे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली.

नाशिक शहरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात करोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या आठवडाभरापासून बाधितांची संख्या ओसरत असतांना म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णसंख्या अधिक आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोठ्याप्रमाणात रुग्ण दाखल आहेत.

त्यात जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून मिळणारी आकडेवारी व प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता यात मोठी तफावत आहे. या आजारावर उपचारासाठी अँम्फोटेरिसिन-बी हे महत्त्वाचे इंजेक्शन आहे. त्याचा पुरवठा अत्यल्प असल्याने नागरिक व डॉक्टर यांनी खा. गोडसे यांची भेट घेवून ही बाब लक्षात आणून दिली. खा. गोडसे यांनी मुंबई येथे औषध प्रशासनाचे सहआयुक्त दा. रा. गहाणे यांची भेट घेतली. यावेळी एल.डी. पिंटो या उपस्थित होत्या.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाआरोग्य प्रशासनाकडून म्युकरमायकोसिस रुग्णांची मिळणारी आकडेवारी आणि प्रत्यक्षात असलेली संख्या यात मोठी तफावत असल्याचे खा. गोडसे यांनी गहाणे यांच्या लक्षात आणून दिले. तसेच अँम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा तातडीने वाढविण्याची आग्रही मागणी केली. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून शासकीय तसेच विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल म्युकरमायकोसिस रुग्णांची सविस्तर माहिती सादर केल्यास सदर इंजेक्शनचा साठा वाढवून मिळणार आहे. दरम्यान खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने लवकरच अँम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यात येणार असल्याची ग्वाही गहाणे यांनी दिली.

नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराने बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत होणारा अँम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा कोटा कमी असल्याने अन्न व औषध प्रशासनाशी झालेल्या चर्चेनुसार लवकरच संबंधित कंपनीकडून इंजेक्शनचा कोटा वाढविण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले.

खा. हेमंत गोडसे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com