नाशिकरोड, नवीन नाशिकमध्ये रुग्णसंख्येत वाढ
नाशिक

नाशिकरोड, नवीन नाशिकमध्ये रुग्णसंख्येत वाढ

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना संसर्गाचा वेग जुलै महिन्यात प्रचंड वाढला असून २९ दिवसांत ६ हजारांच्या वर रुग्णांची भर पडल्याने शहरातील रुग्णांचा आकडा ८ हजार ४२२ पर्यंत गेला आहे. शहरातील सहा विभागनिहाय रुग्णांची वाढ लक्षात घेता पंचवटी विभागात ३० जून रोजी असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या तिप्पटीपेक्षा जास्त रुग्ण वाढ झाली आहे.

नाशिकरोड व नवीन नाशिक विभागात केवळ २९ दिवसांत पाच पटीने रुग्ण वाढले आहे. पंचवटी विभागात ३० जून रोजी ६३० करोना रुग्ण असताना आता २९ दिवसांत अर्थात २९ जुलैपर्यंत याठिकाणी २२९२ इतके रुग्ण वाढले आहे. ही वाढ तिप्पटीपेक्षा जास्त असून अजूनही याभागातील संसर्ग कमी होताना दिसत नाही.

नाशिकरोड विभागात एप्रिल - मे महिन्यात बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण होते. मात्र जून महिन्यात रुग्ण संख्या वाढत गेली.६ एप्रिल ते ३० जूनपर्यंत या विभागात १६८ रुग्ण होते. नंतर मात्र याभागात अनेक हॉटस्पॉट तयार झाले असून आता जुलै महिन्यातील २९ दिवसांत याठिकाणी आत्तापर्यंत १०३१ रुग्ण झाले आहे. ही रुग्णवाढ पाच पटीपेक्षा जास्त झाली आहे.

अशीच अवस्था नवीन नाशिक विभागातील आहे. याठिकाणी ३० जून रोजी २०४ रुग्ण असताना आता २९ दिवसांत हा आकडा १०९४ पर्यंत गेला आहे. तसेच नाशिक पश्चिम व सातपूर विभागात २९ दिवसांत लक्षणिय वाढ झाली आहे. शहरात हॉटस्पॉट बनलेल्या नाशिक पूर्व व पंचवटी विभागात जून व जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com