
नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उंटवाडी गवानजीकच असलेल्या सिटी सेंटर मॉलच्या (City Center Mall) मागील परिसरात खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण (Encroachment) झाले असून येथील अस्वच्छता व गुंडगिरीनेही नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत मनपा व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल (City Center Mall) नागरिकांसाठी नेहमीच आकर्षणाचे बिंदू बनले आहे. येथे दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येत असतात. मात्र याच मॉलच्या मागील भागात जाण्या येण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर अनेक वर्षंपासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे अतिक्रमण (Encroachment) दिवसेंदिवस वाढत आहे.
याठिकाणी गुंडगिरीचे प्रमाण देखील वाढत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा भाग महापालिकेच्या नाशिक पश्चिम विभागात येत असून गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत येत आहे. मनपाच्या अतिक्रमण तसेच स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच गंगापूर पोलिसांची शेवटची हद्द असल्याने या भागात कधीही पोलिसिंग होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे
नंदिनी नदीत टाकला जातो कचरा
या ठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल विक्रेते येथील कचरा नंदिनी नदीत टाकत असल्यामुळे नदीचे प्रदूषण देखील वाढत आहे. याबाबत मनपाच्या स्वच्छता विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.