थंडीत वाढ; पिकांवर परिणाम

शेकोट्या पेटल्या,उबदार कपड्यांना मागणी
थंडीत वाढ; पिकांवर परिणाम

नांदगाव । संजय मोरे Nandgaon

उत्तर आणि पश्चिमेकडून येणारे वारे (wind), अरबी समुद्रात (sea) निर्माण होणारी आर्द्रता (Humidity) तसेच अरबी व बंगालच्या (Bengal) उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वातावरणावर (atmosphere) मोठा परिणाम बघायला मिळतो आहे. बदलेल्या वातावरणाचा शहरासह तालुक्यावर मोठा परिणाम झाला असून तापमानाचा पारा घसरल्याने शहर व तालुक्यात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

हवामान खात्याकडून (weather department) राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, तालुक्यात कुठेही पावसाची नोंद झाली नसल्याचे संबंधित सुत्रांनी सांगितले. शहरासह तालुक्यात गारठा पसरला आहे. तापमानाचा पारा खाली गेल्याने शहर व तालुक्याला अक्षरश: हुडहुडी भरली आहे. आगामी दोन ते तीन दिवस याच प्रकारचे हवामान राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून (Department of Health) करण्यात आले आहे.

खराब हवामानाचा जनसामान्यांवर परिणाम बघायला मिळत असून सर्दी खोकला, घशाचा संसर्ग अशा विकारात वाढ झाली असून लहानग्यांसह वृध्दांमध्ये साथीच्या आजारांची लक्षणे दिसू लागली आहेत. साथीच्या आजारात वाढ झाल्याने शहरातील दवाखाने आणि औषध विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी होतांना दिसते आहे. अलिकडे करोनाच्या साथीने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतांनाच साथीच्या व्याधींनी ग्रासल्याने डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी घरच्या घरी तसेच औषध विक्रेत्यांकडून परस्पर औषधे घेऊन उपचार न करता नियमित डॉक्टरांच्या संपर्कात राहणे महत्वाचे आहे. वाढत्या थंडीचा (cold) शेती क्षेत्रावर (farming sector) देखील विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. तालुक्याचे प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या कांदा पिकावर बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍याची चिंता वाढली आहे. या वातावरणात कांदा पिकावर (onion crop) बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा पिकासाठी वातावरण अनुकुल असल्याने ही पिके घेणार्‍या शेतकर्‍यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे.

तालुक्यात प्रमुख पिकांप्रमाणेच कारले, गिलके, दोडके, टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांना देखील बदललेल्या वातावरणाचा फटका बसला आहे. पुरेसा नायट्रोजन मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटण्यासह आवक खुंटणार असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. दरम्यान, शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेकोट्या पेटू लागल्या आहेत. तसेच उबदार कपड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जुन्या तहसील कार्यालयाजवळ उबदार कपड्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com