ओझरला डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांत वाढ

ओझरला डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांत वाढ

ओझर। वार्ताहर | Ozar

ओझर नगरपरिषद (Ozar Municipal Council) व आरोग्य विभागातर्फे (Department of Health) परिसरात घरोघरी जाऊन सुरू असलेल्या डेंग्यू (Dengue) साथ प्रतिबंध जनजागृती मोहिमेत काही डेंग्यू सदृश रुग्ण आढळुन आले असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क होत काळजी घेण्याचे आवाहन ओझर नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ओझरसह उपनगरामध्ये नगरपरिषद व आरोग्य विभाग यांचेतर्फे डेंग्युसाथ प्रतिबंध जनजागृती मोहीम (Dengue Prevention Awareness Campaign) राबविली जात असून या मोहिमेत डेंग्यूसदृश रुग्ण (Dengue-like patients) आढळुन आले आहे. डासांमुळे पसरणारा हा आजार विषाणूजन्य आजार असून विषाणू एडिस डासाच्या (Aedes mosquito) मादीमुळे पसरतो.

डेंग्यूवर कोणताही नेमका उपचार नसल्याने नागरिकांनी सावध होत काळजी घ्यावी, असे आवाहन करून यासाठी ओझर नगरपरिषद, आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत (Primary Health Centre) डेंग्यू साथ प्रतिबंध व उपाययोजना याविषयी जनजागृती मोहिम व डासनिर्मूलन फवारणी मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती ओझर नगरपरिषदेने दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत ओझरसह परिसरातील नागरिकांचे उद्बोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये नागरिकांनी साठवलेले पाणी (Stored water) उघडे ठेवू नये. भांडी, कपडे स्वच्छ व कोरडी ठेवावी, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे मध्ये तेल टाकावे व स्वच्छ ठेवावा. घराभोवती निरूपयोगी वस्तु ज्यात पाणी साचते अशा वस्तू ठेवू नये, घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, टाक्यांना झाकणे लावावी, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.

अतिसार, पातळ संडास, थंडी, ताप आल्यास आरोग्य सेविका, सेवक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरीत संपर्क साधून उपचार करून घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे. ओझर शहरात राबविण्यात येणार्‍या या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ओझर नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या सात ते आठ टिम कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी ओझर नगरपरिषदेची डेंग्यु साथ प्रतिबंध जनजागृती मोहिम अंतर्गत एक टिम मधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ओझर नगरपरिषदेचे कर्मचारी मोतीराम थोरे, विकास पीठे, उमेश रामटेके, प्रशांत बिहाडे, सचिन कदम, किशोर त्रिभुवन, महेंद्र जाधव, बापू कर्पे, आधार भंडारे आदींसह नगरपरिषद व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी शहरात फिरून जनजागृती करीत असल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com