डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामधील घटनेचा आँखो देखा हाल!
सौजन्य : अभिषेक गोरे

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामधील घटनेचा आँखो देखा हाल!

नाशिक । प्रतिनिधी

सव्वाबारा-साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. ऑक्सिजनचे रिफील चालू होते. त्यातून जे कनेक्शन रुग्णालयाला गेले आहे त्याचा एल्बो तुटून गेला. आणि ऑक्सिजनची गळती झाली. त्याचा फोर्स भयंकर होता. तो इतका जोरात होता की आजूबाजूला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पसरला. काही मिनिट काय झाले हे कोणालाच कळाले नाही. रुग्णालयाच्या आजूबाजूला घरे आणि दुकाने आहेत. पांढरा धूर पसरल्याने लोक एकदम घाबरले. थोडीशी पळापळ देखील झाली.

इकडे रुग्णालयात खाली ऑक्सिजनची गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरु झाले. अग्निशामक दल आले. जिथून लीक झाले त्याच्या वरती एक कॉक होता. उगाचच कोणी हात लावून तो फिरवू नये म्हणून त्याला लॉक असते. रुग्णालयाचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान यांनी प्रयत्न केले आणि ते लॉक तोडण्यात यश आले. नंतर दुरुस्ती झाली. पण तोपर्यंत रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक तास गेला होता. या दरम्यान पोलीस, अधिकारी दाखल व्हायला सुरुवात झाली होती. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणली.

तोपर्यंत वरती वॉर्डमध्ये सर्वांची धावपळ उडाली होती. कारण अनेक रुग्णांना ऑक्सिजन लावलेला होता. काही व्हेन्टिलेटवर होते. त्यातील काहींची प्रकृती थोडी सिरीयस होती. अचानक सगळ्यांचा ऑक्सिजन ड्रॉप झाला होता.

डॉक्टरांची आणि सर्व कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. रुग्णांवर पर्यायी उपचार करण्याचा प्रयत्न सुरु झाला. कोणी रुग्णांची छाती दाबत होते. कोणी पाय चोळत होते. काहींनी ऑक्सिजनची सिलेंडर ढकलत आणली. ती लावायचा प्रयत्न केला गेला. काय केले म्हणजे रुग्णांना बरे वाटेल अशीच सार्‍यांची धावपळ सुरु होती. काही रुग्णांना दुसर्‍या वॉर्डमध्ये नेता येईल का असाही विचार केला गेला. ही सगळी धावपळ काही काळ सुरूच राहिली. रुग्णांना बरे वाटावे असेच सार्‍यांना वाटत होते.

तोपर्यंत सगळीकडे ही बातमी पसरली. स्वाभाविक रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. वॉर्डमध्ये काही काळ खूप गर्दी झाली. खूपच गोंधळ उडाला.

लिकेज दुरुस्त होईपर्यंत एक तास गेला होता. त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला. पण तो एक-सव्वा तास घातक ठरला. या दुर्घटनेत 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे सगळे फारच त्रासदायक घडले. सुन्न करणारे.......

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com