
नाशिक । प्रतिनिधी Nashik
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरिता व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जातात. या अंतर्गत अनुसूचित जमातीच्या दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येणार आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत येणार्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सैनिकी आश्रमशाळा, नामांकित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा यामध्ये शिकणार्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस योजना लागू असणार आहे. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सैनिकी शाळा, नामांकित आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळा तसेच इतर शाळांमधील शैक्षणिक वर्ष सन 2022 -2023 या शालांत परीक्षा अर्थात दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावी परीक्षेत कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेत गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणार्या पाच मुले आणि पाच मुली यांना खालीलप्रमाणे रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येणार आहे.
बक्षिसाचे स्वरूप
प्रथम क्रमांक 30 हजार रुपये , चतुर्थ क्रमांक 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 25 हजार रुपये, पाचवा क्रमांक 10 हजार रुपये , तृतीय क्रमांक 20हजार रुपये. तसेच राज्यातील नऊ विभागीय मंडळामध्ये प्रत्येक शिक्षण मंडळात प्रथम येणार्या तीन मुले व तीन मुली यांनादेखील प्रथम क्रमांकास 25 हजार, द्वितीय क्रमांकास 15000/- आणि तृतीय क्रमांकास 10 हजार असे बक्षीस देण्यात येणार आहे.
आमचे विद्यार्थी प्रतिभावान आहेत. मेहनत आणि चिकाटी यामुळे नेहमीच प्रगती करतात. सदर योजनेच्या माध्यमातून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरुपात पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आर्थिक मदत होणार आहे.
- नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र