मुलींसाठी अद्ययावत अभ्यासिकेचे लोकार्पण

समाजाचा बौद्धिक विकास महत्त्वाचा- माजी आमदार राजाभाऊ वाजे
मुलींसाठी अद्ययावत अभ्यासिकेचे लोकार्पण

सिन्नर । वार्ताहर Sinnar

विकास अनेक प्रकारे करता येतो. मात्र, कोणत्या पद्धतीने विकास झाला, याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. रस्ते, गटार हा भौतिक विकास होतच राहणार. पण, समाजाचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे ( Former MLA Rajabhau Waje ) यांनी केले.

संजीवनीनगर परिसरात नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुलींसाठी अद्ययावत अभ्यासिका साकारली असून या अभ्यासिकाचे उदघाटन वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

वाढदिवस आपण दरवर्षी साजरा करतो. मात्र, तो कशा पद्धतीने साजरा केला हे महत्वाचे आहे. पाण्यासाठी जशी चळवळ उभी राहते, तशी अभ्यासिकेची चळवळ उभी राहिली पाहिजे असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष किरण डगळे यांनी पावसे यांना प्रत्येक वाढदिवसाला असेच नवनवीन उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

यावेळी कैलास निकुंभ व पोपट बोडके यांच्याकडून अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्यात आली. तर मविप्रचे माजी संचालक कृष्णाजी भगत यांनी सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने अभ्यासिकेला दोन कपाट भेट दिली. याप्रसंगी नगरसेवक विजय जाधव, पंकज मोरे, रुपेश मुठे, शैलेश नाईक, पिराजी पवार, दीपक खुळे, अशोक फडके व परिसरातील महिला, विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.

56 मुलींना मोफत प्रवेश

नगरसेवक पावसे यांनी परवानगी मिळवत याठिकाणी आपल्या स्वखर्चाने एकाचवेळी 28 मुलींना अभ्यास करता येईल अशी व्यवस्था केली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत अभ्यासिका सुरू राहणार असून सहा-सहा तासांच्या दोन बॅचेसमध्ये 56 मुलींना मोफत अभ्यास करता येणार आहे.

अभ्यासिकेत सीसीटीव्ही

अभ्यासिकेत मुलींना सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके, स्वच्छतागृह, वायफाय सुविधा, सुटसुटीत आसन व्यवस्था, वाचनासाठी विविध इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे उपलब्ध असणार आहेत. याठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार असून पुढील काळात व्याख्यानमाला आयोजित करणार असल्याचे नगरसेवक पावसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com