
सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
निमाच्या बँक समिट व ऑटो एक्सपोचे निमा हाऊस येथे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जिंदाल सॉ लि.चे अध्यक्ष व्ही. चंद्रशेखर, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, उपाध्यक्ष आशिष नहार, सिन्नर उपसमितीचे चेअरमन संदीप भदाणे, सिन्नर डेव्हलपमेंट उपसमितीचे चेअरमन किरण वाजे, ऊर्जा उपसमितीचे चेअरमन प्रवीण वाबळे, चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख,मिलिंद राजपूत उपस्थित होते.
उद्योग विकासाठी प्रत्येक उद्योगाला भांडवलाची आवश्यकता असते. उद्योगांना चालना देण्यात बँकांचा मोठा वाटा असतो. उद्योगाला पुरेशा प्रमाणात आर्थिक सहाय्यता मिळाल्यास उद्योग विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकते. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. बँकेच्या कर्जाची परत फेड वेळेवर केली पाहिजे. निमा मार्फत आयोजित करण्यात आलेल्या बँक समिट व ऑटो एक्स्पोमुळे उद्योजकांचे अनेक आर्थिक प्रश्न मार्गी लागणार असल्याचे चंद्रशेखर म्हणाले.
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने निमा मार्फत अनेक चांगले उपक्रम राबविवले जात आहेत. करोनासारख्या महामारीनंतर औद्योगिक विकास हा झपाट्याने होत असतांना दिसत आहे. प्रत्येक उद्योगांकडे चांगले काम असल्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर वाढलेल्या कामामुळे उद्योजकांना मोठ्या प्रमाणामध्ये बीज भांडवलाची सुद्धा आवश्यकता भासत आहे. केंद्र सरकारच्या उद्योगांसाठी असलेल्या चांगल्या धोरणामुळे देशाचा विकास झपाट्याने होत असताना दिसत आहे. उद्योजकांना बँकांची कार्यप्रणाली व विविध योजनांची माहिती तत्परतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निमा मार्फत बँक समिटचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती बेळे यांनी दिली.
तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी यात आपला सहभाग नोंदविला आहे.प्रास्ताविक आशिष नहार यांनी केले. सूत्रसंचलन मिलिंद राजपूत केले. आभार प्रविण वाबळे यांनी मानले. हे प्रदर्शन उद्या (दि.29) सकाळी 11 ते 4 या वेळेत सर्व नागरिक, कामगार, कर्मचारी व उद्योजकांसाठी खुले असणार आहे.