नाशिकरोड । प्रतिनिधी

येथील विभागीय आयुक्त कार्यालय मार्गावरील नाशिकरोड न्यायालयाची नवीन इमारती साकारली आहे. इमारतीचे उद्घाटन रविवारी (दि.14) सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनुज्ञा प्रभुदेसाई यांच्याहस्ते ऑनलाईन होणार आहे.

जिल्हा न्यायाधीश अभय वाघोसे, नाशिकरोड न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश टी. एन. आवळे तसेच न्यायाधीश गणेश देशमुख व अन्य जिल्ह्यातील न्यायाधीश, वकील आदी मान्यवर ऑनलाईन उपस्थिती राहणार असल्याची माहिती नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड यांनी दिली. सोमवारपासून न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे.

दि. 28 जुलै 18 रोजी उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे यांच्याहस्ते नवीन इमारतीचे भूमीपूजन झाले. कोर्टासाठी जागा मिळवण्याकरीता ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांनी अजित पवार यांच्यामार्फेत प्रयत्न केले होते. इमारत निधीसाठी सुरेशबाबा पाटील, तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप, खा. हेमंत गोडसे, आ. राहुल ढिकले, सरोज आहिरे आदींनी प्रयत्न केले.

तीन एकरवर असलेल्या आणि दोन वर्षात तयार झालेल्या या इमारतीसाठी साडे चौदा कोटी रुपेय खर्च आला आहे. न्यायाधीशांची आठ दालने, पुरुष व महिला वकिलांसाठी स्वतंत्र बार रुम, पक्षकारांना आत व बाहेर बसण्याची तसेच पार्किंगची प्रशस्त सुविधा आहे. भविष्यात वरिष्ठ व अपिलेट कोर्ट येथे येण्याची शक्यता आहे. नगरसेवक सीमा ताजणे यांनी पक्षकारांसाठी 25 बेंच दिले आहेत.

हक्काची इमारत

नाशिकरोड कोर्टापूर्वी महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये होते. त्या इमारतीला आग लागल्यानंतर दत्त मंदिर रोड येथे व नंतर 1987 साली दुर्गा गार्डन जवळील नगरपालिकेच्या जुन्या दवाखान्यात कोर्ट स्थलांतरीत झाले. तेथे पार्किंगपासून अनेक प्रकारच्या समस्या होत्या. आता 34 वर्षांनी स्वमालकीच्या जागेत कोर्ट आले आहे.