
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशन(Nashik District Tennis Volleyball Association), महाराष्ट्र असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली इनडोअर हॉलमध्ये 23 व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेला (23rd National Tennis Volleyball Championships)उत्साहात सुरूवात झाली
स्पर्धेचे उद्घाटन कारगिल युद्धात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेले मेजर नायक दीपचंद (Major Nayak Deepchand )यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे, फेडरेशनचे खजिनदार धर्मेंद्र सिंग जडेजा, अखिल भारतीय मराठा महासंघ डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.उमेश मराठे,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, महाराष्ट्र टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनचे सरचिटणीस गणेश माळवे,. नागेश्वर राव (कर्नाटक), हद्रसिंग (दिल्ली) , नरसिंहम्मा (तेलगंणा), विजया (तामिळनाडू) आदी राज्य सचिव उपस्थित होते.
यावेळी नायक दीपचंद म्हणाले,आम्ही जसे युद्धात पराक्रम गाजवून पाकिस्तानला नमवले, तसे खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून भारताचा तिरंगा जगभरात फडकवावा. स्पर्धेत संपूर्ण भारतातून 18 राज्यांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धा मिनी आणि सबज्युनिअर या दोन गटात खेळविल्या जात आहेत. सबज्युनिअर मुले गटात साखळी सामन्यात गुजरात, तेलगंणा, मणिपूर, यजमान महाराष्ट्र यांनी विजय प्राप्त करून बाद फेरीत प्रवेश केला. तर मुलीच्या गटात महाराष्ट्र संघाने आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश संघाचा पराभव करत विजयी घोडदौड करत बादफेरीत प्रवेश केला.
दुसर्या गटामध्ये गुजरात संघाने कर्नाटक आणि तेलंगणा संघाचा पराभव करत बाद फेरी गाठली. मिनी मुले गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक संघाने प्रवेश केला. मुलीच्या गटात महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश संघानी चांगला खेळ करून दोन विजयासह बॅड फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणून प्रफुल्ल कुमार बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण घोलप, गणेश पाटील, अक्षय गामणे, सिध्दांत लिपने ,उमेश सेनभक्त, गणेश कलांगूल, बंडू जमाधडे, निलेश माळवे आदी काम पाहत आहेत.