अत्याधुनिक रुग्णालयाचे लोकार्पण

डायलिसीस सुविधा उपलब्ध करण्याचा संकल्प : भुसे
अत्याधुनिक रुग्णालयाचे लोकार्पण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहर-परिसरातील नागरिकांसाठी सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक व वातानुकूलित 100 खाटांच्या मॉड्युलर रुग्णालयाची ( Moduler Hospital in Malegaon )उभारणी करण्यात आली आहे. या अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णालयामुळे मालेगावच्या आरोग्यसेवेत आणखी भर पडेल. असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (State Agriculture Minister Dada Bhuse)यांनी व्यक्त केला.

अमेरिकन इंडिया फाऊंडेशन (American India Foundation) व मनपाच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव कॅम्पात ( Malegaon Camp )उभारलेल्या अत्याधुनिक 100 खाटांच्या मॉड्युलर रुग्णालयाचे लोकर्पण भुसे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर उपमहापौर नीलेश आहेर, अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे संचालक मॅथ्यू जोसेफ, महेश श्रीनिवास, आय. आय. केअरचे संचालक डॉ. संतोष भोसले, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, प्रभाग सभापती कल्पना वाघ, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा गंगावणे, माजी उपमहापौर सखाराम घोडके, भिकन शेळके, प्रमोद पाटील, मनोहर बच्छाव, राजाराम जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी व आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी रुग्णालयाची सविस्तर माहिती दिली.

यावेळी बोलताना ना. भुसे पुढे म्हणाले, अमेरिकन इंडिया फाऊंडेशन ट्रस्ट व मनपाच्या संयुक्त विद्यमाने मालेगावात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक 100 खाटांच्या मॉड्युलर रुग्णालयात गोरगरिब रुग्णांना चांगली सेवा व सुविधा देण्यात येणार आहे.

4 कोटी 50 लाख रुपये खर्चून अमेरिकन इंडिया फाऊंडेशन ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून व मनपाच्या माध्यमातून या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयासाठी आवश्यक स्वतंत्र मनुष्यबळ मानधन किंवा कंत्राटी पद्धतीने मनपाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार असून प्रमुख आजार व स्वतंत्र उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरसुध्दा उपलब्ध करुन दिले जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

या रुग्णालयात एखाद्या रुग्णास दाखल केले, तर त्याच्या नातेवाईकांना बसण्यासाठी सोय तसेच वाहनतळ, पिण्याचे पाणी आदी सुविधादेखील या रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात आय.सी.यु.चे स्वतंत्र 8 बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयात नसतील अशा सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाचे नियम व शिस्त पहिल्या दिवसापासून पाळले गेले पाहिजेत, अशी अपेक्षाही ना. भुसे यांनी व्यक्त केली.

मालेगाव शहरात डायलिसिस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या रुग्णांसाठी सुविधा अपुर्‍या आहेत. भविष्यात या रुग्णालयात स्वतंत्र डायलिसिस सेंटरही उभारण्याचा मानस असल्याचे सांगत मालेगावकरांना अभिमान वाटेल अशा विविध विकासकामांच्या माध्यमातून शहराच्या विकासात आगामी काळात भर पडणार असून 2022 हे वर्ष मालेगाव विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, अशी ग्वाही भुसे यांनी शेवटी बोलतांना दिली.

कार्यक्रमास डॉक्टर्स, आरोग्य सेविका, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com