नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

करोनामुळे रखडलेल्या शैक्षणिक वर्षाचा परिणाम विविध अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकावर होणार आहे. यंदा हे वेळापत्रक कोलमडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

येत्या मे महिन्यात बारावी आणि पदवीच्या परीक्षा असल्याने या सर्व प्रवेश परीक्षा जूनमध्ये होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत १५ पेक्षा अधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षांची सुरुवात दर वर्षी फेब्रुवारीत एमबीए प्रवेश परीक्षेने होते. मात्र, यंदा ही परीक्षा अद्याप आयोजित करण्यात आलेली नाही.

याचबरोबर सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणारी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. या परीक्षेसाठी सुमारे चार लाख विद्यार्थी नोंदणी करतात.

या परीक्षेसाठी देशभरातील सर्व परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षांचे नियोजन पाहून या नऊ दिवसांचे नियोजन सीईटी सेलला करावे लागते. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून याचे नियोजन केले जाते. मात्र यंदा राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळ, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे आयोजन मे महिन्यात होत आहे.

यामुळे यंदा ही परीक्षा जून किंवा जुलैमध्ये होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला तीन लाख ८६ हजार विद्यार्थी बसले होते.

परीक्षेला उशीर झाल्यामुळे शैक्षणिक वर्षही उशिरा सुरू झाले होते. यंदाही परीक्षेला उशीर झाल्यास शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या करोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, प्रशासनाकडून नवे निर्बंध जाहीर करण्यात येत आहेत.

अशा स्थितीत वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे नियोजन करणे कक्षालाही अवघड जाणार असल्याचे कळते.