पश्चिम भागात भात आवणी खोळंबली

बळीराजाची नजर आभाळाकडे
पश्चिम भागात भात आवणी खोळंबली

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी ( Nanashi ) परिसरात ऐन दमदार पाऊस ( Rain) झालेला नाही. शेतकरी ( Farmers) हवालदिल झाले असून हंगाम वाया जातो की काय, अशी भीती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. वळीव पाऊस वगळता दमदार मोसमी पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही. पाऊस जसजसा लांबणीवर पडत आहे तसतशी बळीराजाची चिंता वाढत आहे. या परिसरात प्रामुख्याने भात, नागली, वरई, उडीद, खुरासनी, कुळीथ अशी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके घेतली जातात.

पाऊस लांबल्याने या पिकांना मोठा फटका बसत आहे. काही शेतकर्‍यांनी सुरुवातीला झालेल्या वळीव पावसानंतर नागली, वरई आदींची रोपे टाकली होती. ती आता लावणी योग्य झाली आहेत, पण पावसाअभावी या पिकांची लावणी खोळंबली आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी पाऊस पडेल या आशेवर नागली व वरईची लावणी केली ती पिके कडक उन्हामुळे करपत आहेत. तर भात लावणी ठप्प झाली आहे.

वीज पंप आणि पाण्याची सोय आहे अशा शेतकर्‍यांनी वीज पंपाच्या मदतीने पाणी भरून भात लावणी केली आहे. त्यातही पीक जगेल की नाही याबाबत साशंकता आहे. जुलै महिन्यात या परिसरात संततधार पाऊस होतो. अनेकदा पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते. यंदा मात्र जुलैमध्येही कडक उन्हाळा जाणवत आहे. या कडक उन्हाचा मोठा फटका पिकांना बसत असून उत्पादनावरदेखील मोठा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकर्‍यांची आतापासूनच घालमेल सुरू झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com