शिकारीच्या नादात बिबट्या थेट विहिरीत

बांबू मोळी पाण्यात सोडून आधार
शिकारीच्या नादात बिबट्या थेट विहिरीत

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील दापूर येथे शिकारीच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. स्थानिक शेतकर्‍यांनी रात्रीच्या वेळी विहिरीत पाणी जास्त असल्याने बांबूची मोळी पाण्यात सोडल्याने बिबट्याला त्याचा आधार घेता आला. त्यानंतर सकाळी वनविभागाच्या पथकाने अवघ्या अर्धा तासात लोखंडी पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.

काही महिन्यांपासून तालुक्यातील सर्वच भागात बिबट्याच्या मुक्त संचारासह बिबट्या विहिरीत पडण्याच्या घटना घडत आहेत. दापूर परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती, डोंगराळ भाग व घनदाट झाडी असल्याने बिबट्याचा नेहमी वावर असतो. जुना सिन्नर-दापूर रस्त्यालगत साबळे वस्ती असून या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. शेतकरी निवृत्ती साबळे यांच्या गट नंबर 843 मध्ये त्यांची विहीर आहे. सदर विहीर 50 फूट खोल असून तिच्यात 40 फूट पाणी आहे.

साबळे वस्तीनजीक शेळ्यांच्या गोठ्याचे काम सुरू असल्याने घराजवळच शेळ्या बांधून साबळे हे घराबाहेरच झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास गिन्नी गवताच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या शिकारीच्या शोधात होता. बिबट्याचा घराजवळ बांधलेल्या शेळ्यांवर ताव मारण्याचा प्रयत्न होता. मात्र वस्तीवर असलेल्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात आरडाओरडा सुरू झाल्याने बिबट्याचा गोंधळ उडाला. बिबट्या माघारी फिरत असताना शेतातील विहीर लक्षात न आल्याने बिबट्या एका लोखंडी पत्र्यासह विहिरीत पडला.

बिबट्या विहिरीत पडताच मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याने वस्तीवरील शेतकरी जागे झाले. त्यांनी विहिरीत जाऊन बघितले असता बिबट्या विहिरीत पडला असून तो जिवंत होता. त्यांनी बिबट्याला पाण्यावर तरंगण्यासाठी शक्कल लढवत बांबूची मुळी दोरीला बांधून विहिरीत सोडली. त्यामुळे बिबट्याला त्याचा आधार मिळाला. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली.

सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. पी. झोपे, वनरक्षक पी. जी. बिन्नर, किरण गोरडे, डी. एन. इघे, गोरख पाटील, वसंत आव्हाड, रोहित लोणारे यांचे रेस्क्यू पथक दापूरमध्ये दाखल झाले. सरपंच सोमनाथ आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

रेस्क्यू पथकाने तातडीने बचावकार्य सुरू करून लोखंडी पिंजर्‍याला चारही बाजूंनी दोरखंड बांधले व दरवाजाला एक दोर बांधून विहिरीत सोडण्यात आला. जवळपास चाळीस फूट पाणी असलेल्या विहिरीतून अवघ्या अर्धा तासात रेस्क्यू पथकाने बिबट्याला बाहेर काढण्यात यश मिळवले. बिबट्या रात्रभर पाण्यात भिजल्याने थकलेल्या अवस्थेत होता. सदर बिबट्या दोन ते अडीच वर्षांचा असून त्याची तपासणी केल्यानंतर त्याची रवानगी सिन्नर येथील वन उद्यानात करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com