शिक्षण संस्थेच्या सभासदत्वासाठी ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात

शिक्षण संस्थेच्या सभासदत्वासाठी ग्रामस्थ उपोषणाच्या पवित्र्यात
USER

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील दोडी बु॥ येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे (Shri Brahmananda Swami Shikshan Prasarak Mandal) सभासदत्व मिळावे यासाठी गावातील ग्रामस्थांनी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गणपत केदार यांना निवेदन (memorandum) दिले आहे. सात दिवसांच्या आत ग्रामस्थांना सभासदत्व मिळाले नाही तर अध्यक्षांच्या घरासमोर आमरण उपोषण (hunger strike) करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

संस्थेची 1980 मध्ये स्थापना झाली असून तेव्हा संस्था फक्त दोडी बुद्रुक गावाकरता स्थापन करण्यात आली होती. या संस्थेला ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील गावठाणाची जमीन विना मोबदला देण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थेशी गावातील ग्रामस्थांचा हितसंबंध जोडला गेला आहे. त्या शिवाय संस्थेने सुरु केलेल्या शैक्षणिक शाळा (school) व इतर कारणांसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी निधी, वर्गणी देऊन सहकार्य केले आहे. संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्यातूनच आज गावात संस्थेच्या शाळा व कॉलेजच्या इमारती उभ्या आहेत. मात्र, संस्थेचे अध्यक्ष हे संस्था आपली व कुटुंबाची, नातेवाईकांची खाजगी मालमत्ता आहे अशा पध्दतीने व्यवहार करीत आहेत.

प्रत्येक निवडणुकीत (election) केवळ अध्यक्ष व त्यांच्या नातेवाईक, हितचिंतकांनाच सभासद केले जाते. ग्रामस्थ हे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. ही संस्था कोणाचीही खाजगी मालमत्ता नसून संपूर्ण गावाची आहे. तरीही ग्रामस्थांनी आजपर्यंत हे सहन केले आहे. गावातील सर्व ग्रामस्थांना वर्गणी घेऊन संस्थेचे तात्काळ सभासद करावे. सात दिवसात ग्रामस्थांना सभासदत्व मिळाले नाही तर त्यानंतर सर्व ग्रामस्थ अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर उपोषण करतील असा इशारा या निवेदनात (memorandum) देण्यात आला आहे. संस्थेला स्वतःचे कार्यालय नाही.

अध्यक्ष आपल्या निवासस्थानाचा वापर कार्यालय म्हणून करत असल्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेरच उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या उपोषणानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, गावातील शांतता भंग पावली अथवा काही कायदेशीर पेच निर्माण झाल्यास संस्थेचे अध्यक्ष त्यास जबाबदार राहतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर बाळासाहेब वाघ, रघुनाथ आव्हाड, पांडुरंग आव्हाड, ज्ञानेश्वर आव्हाड, अनिल शेळके, वसंत शेळके, गेनू साळे, शरद वाघ, सुखदेव आव्हाड, गणपती केदार, माधवराव आव्हाड यांच्या सह्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार, सहाय्यक धर्मदाय आयुक्त, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

धर्मदाय आयुक्तांना साकडे

गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्हाला सभासद करावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. मुळात ही संस्था केवळ दोडी बुद्रुक गावाची असून संस्थेच्या दोन माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालय, एक वरिष्ठ महाविद्यालय असून संस्थेला स्वतःचे कार्यालय नाही. संस्थेचा सर्व कारभार अध्यक्ष पांडुरंग केदार हे घरातून चालवत आहेत. संस्थेचे संपूर्ण रेकॉर्ड व सभासद पावती पुस्तके त्यांच्याच घरी असून वेळोवेळी अर्ज करुनही आमच्या अर्जाचा स्वीकार केला जात नाही. त्यामुळे सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी स्वतः येऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व आम्हाला सभासद करावे. त्याशिवाय संस्थेची पंचवार्षिक निवडणूक घेऊ नये अशी मागणीही या ग्रामस्थांनी सहाय्यक धर्मदाय आयुक्तांना निवेदन पाठवून केली आहे.

Related Stories

No stories found.