शहरातील २१३ पोलिसांची करोनावर मात

आरोग्याच्या विविध उपाययोजनांनी वाढली प्रतिकार शक्ती
शहरातील २१३ पोलिसांची करोनावर मात

नाशिक। प्रतिनिधी

शहरात करोना उद्रेकाचा फटका रस्त्यावरील पोलीस यंत्रणेलाही बसला असून दुसर्‍या टप्प्यात आतापर्यंत 278 अधिकारी व कर्मचारी करोना बाधित झाले आहेत. तर 5 जणांचा बळी करोनाने घेतला आहे. मात्र करोनावर मात करत 213 अधिकारी व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी कोवीड केअर सेंटरमध्ये राबवलेल्या विविध उपाययोजनांच्या परिणामी ही आकडेवारी झटपट घटल्याचे समोर येत आहे.

करोनाच्या दुसर्‍या टप्प्याची मोठी झळ पोलिस विभागास बसली आहे. शहर पोलिस दलातील चार कर्मचारी तर एक अधिकारी करोनामुळे शहीद झाले. मात्र, मागील काही दिवसांपासून हळुहळु का होईना पोलिसांमधील करोनाचे प्रमाण उतरणीला लागले आहे. सध्या 66 पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांवर कोव्हिड केअर सेंटर अथवा घरामध्येच उपचार सुरू आहेत.

पोलिसांना योग्यवेळी उपचार मिळावेत यासाठी पोलिस मुख्यालयात पोलिस कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी ग्रीन ज्युस, आरोग्य स्नान, योगा, जलनीती असे विविध उपक्रम राबवल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून पोलीस लवकर करोनामुक्त झाल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. तसेच पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पुढाकार घेऊन अत्यवस्थ पोलिसांना हॉस्पिटलमध्ये बेड्सही राखीव ठेवण्याचे आदेश दिलेले होते.

शहर पोलिस दलात फेब्रुवारी महिन्यातच करोनाचा फैलाव सुरू झाला होता. मे महिन्यापर्यंत 28 पोलिस अधिकारी व 250 कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाली. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत करोनाचा प्रसार झपाट्याने वाढला. शहरातील करोनाचे वाढते प्रमाण बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना बाधित केले.हळुहळु बाधित पोलीस करोना रूग्णांचा आकडा 278 इतका झाला. 4 एप्रिल ते 15 मे या कालावधीत आणखी दोन कर्मचारी आणि एका अधिकार्‍याचा करोनाने बळी घेतला.

दुसर्‍या टप्प्यात 28 पोलिस अधिकार्‍यांना तर 250 पोलिस कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाली. त्यापैकी सध्या 3 अधिकारी व 63 कर्मचार्‍यांवर उपचार सुरू आहेत. शेवटच्या आठवड्याभरात नवीन करोना बाधित फारसे समोर आले नाहीत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com