नाशिक बाजार समितीत भाजीपाला आवक वाढली
नाशिक

नाशिक बाजार समितीत भाजीपाला आवक वाढली

ढोबळी व हिरवी मिरची, दोडका, गिलके भावात सुधारणा

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊन संंपल्यानंतर आता राज्यातील भाजीपाला मार्केट पुर्ववत सुरु झाले आहे. यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येणार्‍या भाजीपाल्याची आवक वाढली असुन गुरुवारी (दि.१६) समितीत १० हजार क्विंटलच्यावर भाजीपाल्याची आवक झाली. मुंबई उपनगरांकडे ६२ व गुजरातकडे २६ वाहने रवाना झाली. दरम्यान गवार, भेंडी, दोडका, कारले व हिरवी मिरचीला शुक्रवारी चांगला भाव मिळाला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून लॉकडाऊनच्या अगोदर मुंबई व उपनगरांसाठी १०० गुजरात २६ व इतर ठिकाणी अशी १३३ वाहनातून भाजीपाला रवाना झाला. आता याठिकाणी ढोबळी व हिरवी मिरची, दोडके, गिलके व टमाटा भावात चांगली सुधारणा झाली आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यापुर्वी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने सर्वच भाजीपाल्याची आवक घटली होती.

परिणामी भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झाली होती.

मात्र जिल्ह्यात बहुतांशी भागात मागील काही दिवसात पाऊस पडल्याने आता भाजीपाल्याला जीवदान मिळाल्यानंतर गेल्या तीन चार दिवसांपासुन भाजीपाला आवक वाढत आहे. गुरुवारी बाजार समितीत १० हजार २१२ क्विंटल भाजीपाल्यासह कांदा - बटाटा फळांची आवक झाली. नाशिकरोड येथील उपबाजारात देखील भाजीपाला चांगल्या प्रमाणात आला. यामुळे मुंबईकडे जाणार्‍या भाजीपाल्यात देखील वाढ झाली आहे. याठिकाणाहून भाजीपाला, कांदा मुबईसह उपनगरांकडे १०० गुजरात २७, वाडा ३, पुणे १, इंदौर २ अशी एकुण १३६ वाहने रवाना झाली.

Deshdoot
www.deshdoot.com