मालेगाव तालुक्यात 1,684 उमेदवार रिंगणात

808 इच्छुकांची माघार, तीन ग्रामपंचायती बिनविरोध
मालेगाव तालुक्यात 1,684 उमेदवार रिंगणात

मालेगाव । Malegaon (प्रतिनिधी)

तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींपैकी लखाने, चौंढी व ज्वार्डी बु.॥ या तीन ग्रामपंचायतींसह 208 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 96 ग्रामपंचायतींच्या 761 जागांसाठी 1684 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अनेक गावांत इच्छुकांच्या माघारीचे प्रयत्न असफल ठरल्याने दुरंगी, तिरंगी लढत अटळ ठरली आहे.

तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींच्या 969 जागांसाठी तब्बल 2 हजार 825 इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी मिळाल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक गावांत पॅनल नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.

विजयाला अडसर ठरू पाहणार्‍या इच्छुकांनी माघार घ्यावी यासाठी पॅनल नेत्यांकडून प्रयत्न केले गेले. त्यास अनेक ठिकाणी प्रतिसाद मिळून आल्याने तीन ग्रामपंचायतींसह तब्बल 208 जागा बिनविरोध होऊ शकल्या. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी, तिरंगी लढत ठरली आहे.

माघारीच्या अंतिम मुदतीत 808 इच्छुकांनी आपले नामांकन मागे घेतल्याने लखाने, ज्वार्डी व चोंडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर टेहरे ग्रामपंचायतीच्या 13 पैकी 6 तर रावळगावला 17 पैकी 5 जागा व सावकारवाडीला 9 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत.

माघारीनंतर बिनविरोधाचे चित्र स्पष्ट होताच विजयी झालेल्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. माघार व चिन्हवाटप असल्यामुळे तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com