
नाशिक । प्रतिनिधी Nashik
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत सर्व क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहेत. त्यांच्या या योगदानामुळेच आज अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेत देखील त्यांचे न भुतो न भविष्यती असे स्वागत झाले आहे. कितीही विरोधक एकत्र आले तरी पुन्हा एकदा 2024 मध्ये केंद्रात भाजपचेच सरकार येईल, यात युवा शक्तीच्या ताकदीचा मोठा हातभार राहणार असल्याचे विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केला.
नाशिक दौर्यावर आले असता लोणीकर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अमित घुगे, सुनिल बच्छाव, किरण बोराडे, विजय बनसोडे, योगेश मैद, सचिन दराडे, सागर शेलार, शहर चिटणीस संतोष नेरे, विलास कारेगावकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी अमित घुगे यांनी प्रास्ताविकात युवा मोर्चाच्या उपक्रमाविषयी माहिती देत लोणीकर व उपस्थितांचे स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 20 ते 25 टक्के युवकांंना संधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांंनी सांगितले. त्यासाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आग्रही आहेत. आयुष्यमान भारतसारख्या अनेक योजनांमुळे युवकांना मोठा आधार मिळाला आहे. अनेक छोटे, मोठे उद्योजक निर्माण झाले आहेत. 41 लाख युवकांना मुद्रा लोणसारख्या योजना मदतगार ठरलेल्या आहे. नऊ वर्षात मोदी यांनी केलेली कामे युवकांमार्फत घरोघरी पोहोचवण्याचे काम भारतीय जनता युवा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते करत आहेत. खा. राऊत देशाचे मोठे नेते असून, त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. आमचे वरिष्ठ नेते त्याबाबत बोलतील असे स्पष्ट केले.
आरोग्य क्षेत्रात भारत अग्रेसर
आरोग्य क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण बनला असल्याचे लोणीकर यांनी सांगितले. 2014 पूर्वी आरोग्य विभाग सक्षम नव्हता. जगात फक्त 5 देशांनी करोनाची लस तयार केली. त्यात भारताचा समावेश होता. आपल्या देशाने लस तयार करून इतर 40 देशांना देखील लस निर्यात केली. या उलट जर काँग्रेसचे सरकार असते तर लस दुसरीकडून आयात करावी लागली असती असेही लोणीकर यांनी सांगितले.