लसीकरण हाच आशेचा किरण !

वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री पाटील
लसीकरण हाच आशेचा किरण !

नाशिक | Nashik

लसीकरणाविषयी अजूनही खूप गैरसमज आहेत. उलट करोनापासून बचाव करण्याचा लसीकरण हाच एक आशेचा किरण आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घ्यावेच असा सल्ला ईएसआयसी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री पाटील यांनी दिला.

प्रश्न - लस कोणी घ्यावी?

उत्तर- १८ वर्षे वयापासून पुढील नागरिकांनी घ्यावी. ज्यांना को-मोर्बडीटी आहे म्हणजे मधुमेह, रक्तदाब विकार अशा व्याधी आहेत त्यांनी तर आधी घ्यावी. कारण सामान्य माणसांच्या तुलनेत त्यांची प्रतिकारशक्ती थोडीशी कमी असते. म्हणून सरकारने सुद्धा लसीसाठी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्यात अशा लोकांचा लसीकरणाच्या पहिल्या ग्रुपमध्ये समावेश केला होता.

प्रश्न - कोणी घेऊ नये?

उत्तर- आपल्या देशाच्या सध्याच्या प्रोटोकॉल प्रमाणे सध्या तरी गर्भवती महिला आणि १८ वर्षांखालील मुले यांना लस दिली जात नाही.

प्रश्न - लस घ्यायला जातांना काय काळजी घ्यावी?

उत्तर- जाताना गर्दी टाळायची. मास्क बांधायचाच. सोशल डिस्टंसिंग पाळायचे. काहीतरी खाऊन यायचे. थोडक्यात काय तर तुमची जी दिनचर्या आहे त्यात कोणताही बदल करायचा नाही. ती आहे तशीच ठेवायची आणि लस घ्यायची.

प्रश्न - लस घ्यायच्या दिवशी मधुमेही, रक्तदाब विकार किंवा असे विकार असणाऱ्यांनी त्यांची नेहमीची औषधे घ्यायची का?

उत्तर- अर्थात घ्यायचीच! लस घ्यायला जाताना नेहमीची औषधे घ्यायची नाही असे जर कोणाला वाटत असेल तर एकदम चुकीचे आहे. तुम्हाला सुरु असलेली नेहमीची औषधे तुम्ही नेहेमीसारख्या घ्यायची. त्यात बदल करायचे नाहीत.

प्रश्न - लस घेतल्यानंतर प्रतिकारक्षमता कशी विकसित होते?

उत्तर- लसीच्या पहिल्या डोसनंतर तुमची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढते. दुसऱ्या डोसनंतर ३ ते ६ आठवड्यानंतर पूर्ण प्रतिकारशक्ती येते.

प्रश्न - लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही करोना होऊ शकतो?

उत्तर- आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या ६५ टक्के एफिकसीच्या लसी आहेत. म्हणजे तुम्ही लस घेतली तरी तुम्हाला करोना होण्याची शक्यता ३५ टक्के आहे. पण यातील सर्वात महत्वाची आणि सकारात्मक गोष्ट अशी आहे की, लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर जरी तुम्हाला करोना झाला तरी तुम्ही दगावणार नाही.

तुम्हाला करोनाची सिरिअस लक्षणे जाणवणार नाहीत, म्हणजे ऑक्सिजनची आणि व्हेन्टिलेटरची गरज भासणे इतका त्रास होणार नाही. साधा फ्लू झाल्यासारखा त्रास होऊ शकतो. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणूनच लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, हात धुणे, सोशल डिस्टंसिंग आणि उगाचच गर्दी न करणे हे निर्बंध प्रत्येकाने पाळायचेच आहेत.

प्रश्न - लसीचे दुष्परिणाम आहेत का?

उत्तर- आपल्याकडे ज्या दोन लस दिल्या जात आहेत त्यांचे कोणतेही सिरिअस दुष्परिणाम समोर आलेले नाहीत. लस घेतल्यानंतर थोडीशी कसकस, ज्या हातावर लस घेतली आहे तो हात दुखल्यासारखे वाटणे, रात्री थोडा ताप आपल्यासारखे वाटणे असा त्रास होऊ शकतो पण तो सुद्धा जास्तीत जास्त दीड ते दोन दिवस. त्यापेक्षा जास्त नाही.

काहींना तर तोही त्रास झालेला आढळत नाही. समजा कोणाला लस घेतल्यानंतर चार पाच दिवसांनी लक्षणे दिसली किंवा खूप ताप आला तर लक्षात घ्या, तो ताप तुम्हाला नक्कीच लसीमुळे आलेला नसतो. असे काही झाल्यास उलट तुम्ही सावध व्हा. आणि तुम्ही करोना रुग्णाच्या संपर्कात आला आहात का यात लक्ष घाला.

प्रश्न- लसीकरणाविषयी खूप गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर करोना होतो हा त्यातील प्रमुख एक. तुम्ही काय सांगाल?

उत्तर- लस घेतली म्हणून करोना मुळीच होत नाही. लस घेतली म्हणून करोना होण्याची शक्यता शून्य टक्के आहे.

असा कोणाला झाला असेल तर त्याने निर्बंध पाळले नाही असा त्याचा अर्थ आहे. किंवा लस घ्यायच्या आधी पण त्याला संसर्ग झालेला असू शकतो किंवा नंतरही तो करोना रुग्णाच्या संपर्कात आलेला असू शकतो. निर्बंध पाळले नाहीत म्हणूनच असा त्रास होऊ शकतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com