नाशिक । प्रतिनिधी

नाशिक विभागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, निवासस्थानांच्या आवारात ‘रेन हार्वेस्टिंग प्रणाली’ राबवून पाण्याच्या पुनर्भरणाद्वारे जलस्त्रोतांचे बळकटीकरण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.

गोदावरी प्रदूषण निवारण जनहित याचिका क्रमांक अनुषंगाने पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या दृष्टीने ‘रेन हार्वेस्टिंग प्रणाली’ राबवण्याची गरज गमे यांनी व्यक्त केली. पाण्याच्या पुनर्भरणाद्वारे पिण्याच्या जलस्त्रोतांचे जलसंधारणाचे विविध उपाय अंमलात आणून भूजलाची एकूण पातळी वाढवण्याचा प्रयत्न जलसंधारण विभागाकडून केला जात आहे. त्याअनुषंगाने जलसंधारण विभागाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पाण्याच्या पुनर्भरणाद्वारे जलस्त्रोतांच्या बळकटीकरणात सर्वांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी सर्व विभागप्रमुखांना केले आहे.

नाशिक विभागात कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या शासकीय इमारती, निवासस्थाने यांची जुनी बांधकामे आहेत. या शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने व त्यांच्या आवारात पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याच्या दृष्टीने सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, निवासस्थानांच्या आवारात रेन हार्वेस्टिंग प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या आहेत.