‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवा

अप्पर पोलीस अधीक्षक वालावलकर यांचे आवाहन
‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

करोनाचे ( Corona ) संकट पूर्णपणे संपलेले नाही. त्यात आपल्या अनेक आप्तेष्टांना आपण गमावले आहे. गणेश स्थापनेबाबत प्रशासन जोर जबरदस्ती करणार नाही. मात्र, प्रत्येकानेच जबाबदारीने वागल्यास कारोनाला हरवणे शक्य होणार आहे. त्यामूळे गणेश मंडळांनी गणेशाच्या स्थापनेचा आग्रह न धरता एक गाव, एक गणपती उपक्रम One Village, One Ganpati’ राबवून मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श ठेवावा, असे आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर ( Upper District Superintendent of Police Sharmishtha Walawalkar )यांनी केले.

नगर परिषदेच्या आण्णाभाऊ साठे कलामंदिरात आयोजीत शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस उपअधिक्षक सोमनाथ तांबे, तहसिलदार राहूल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरिक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरिक्षक दशरथ चौधरी व्यासपिठावर उपस्थित होते. सार्वजनिक गणेश स्थापना करण्यास प्रशासनाचा विरोध नाही. मात्र, त्यासाठी शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणेही तेवढेच महत्वाचे आहे.

निर्बंधांचे उल्लंघन झाल्यास मंडळाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोरोना पाठोपाठ चिकन गुनिया, डेंग्यूही आला आहे. मुंबई, पूण्याच्या मध्यावर असल्याने कोरोनाचा प्रसार तालुक्यात वाढतोच आहे.गर्दी यासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. त्यामूळे एक गाव, एक गणपती हाच उपक्रम पुन्हा एकदा राबवणे योग्य ठरेल असे त्यानीं स्पष्ट केले. शांततेत सण साजरे करण्याची तालुक्याची परंपरा असून यावर्षीही ही परंपरा कायम राहील अशी खात्री तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे यांनी दिली.

कुणी प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केले आणि पोलीसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केली तर तालुक्यातील आपल्यासह एकाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी संबंधितांना सोडण्यासाठी फोन करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. अनाठाई खर्च टाळून कोरोनामूळे मृत्यू आलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन सिटूचे हरीभाऊ तांबे यांनी केले.

मिरवणुकीला परवानगी नाही

गणेश स्थापनेच्या व विसर्जनाच्या मिरवणूकीला बंदी घालण्यात आली असून अशा कुठल्याही मिरवणूकीला परवानगी दिली जाणार नाही. पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. वाजंत्री वाजवणारेच एकत्र आले तरी ही संख्या ओलांडली जाते. मोठे संकट येऊ नये म्हणून आपण सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे वालावलकर म्हणाल्या.

विसर्जनासाठी 25 ठिकाणे

गणेश विसर्जनासाठी शहर व परिसरातील 25 जलस्त्रोतांजवळ गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था नगर परिषद करणार असल्याचे मुख्याधिकारी केदार म्हणाले. त्यासाठी ठिकाणांची निश्चिती करण्यात आली आहे. यापूर्वी प्रत्येक जलस्त्रोताजवळ दोन ट्रॅक्टर ठेवले जात होते. यंदा तेथे 4 ट्रॅक्टर ठेवण्यात येतील. कुंदेवाडी येथील जलस्त्रोतांजवळही ट्रॅक्टरची सख्या वाढवण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

जलस्त्रोत दुषितहोणार नाहीत अशा पध्दतीने मूर्ती विसर्जनाच्या जागा निश्चित करण्याचे आवाहन नामदेव कोतवाल यांनी केले. तालुक्यात पर्जन्यमान कमी झाले असून मंडळांनी कमीत कमी उंचीच्या गणेश मूर्ती घ्याव्यात असे आवाहन नगराध्यक्ष किरण डगळे यांनी केले. विसर्जनाच्या पातळीवर नगर परिषद योग्य ती सर्व काळजी घेईल असेही त्यानीं स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com