महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी मांढरे यांचे निर्देश
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करा

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ते गरजू लोकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत त्वरित लाभ मिळून या योजनेची पारदर्शक व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने संदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की साथरोगाची परिस्थिती अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. या परिस्थितीत सर्व सामान्य ते गरजू रुग्णांना आरोग्य संबंधित सर्व सेवा उपलब्ध होण्यासाठी शासनस्तरावर महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे.

परंतु या योजनेचा लाभ सामान्यपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी सदर योजनेत सुसुत्रता आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. करोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त रुग्णालयांचा या योजनेंतर्गत समावेश करून उपचारासाठी रुग्णांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.

त्याच बरोबर या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी असणार्‍या नियमांची व बदलांची अद्ययावत माहिती संबंधित रुग्णलयांना वेळोवेळी उपलब्ध करून द्यावा या सूचना त्यांनी दिल्या. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सद्यस्थितीत अनेक बाबतींत मध्ये शासनाने नियमांमध्ये शिथिलता दिलेली आहे.

या संपूर्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयातून दररोज सनियंत्रण करण्यात येणार असून संनियंत्रणची जबाबदारी उपजिल्हाधिकारी निलेश श्रिंगी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.

बैठकीत अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नाडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, अतिरीक्त शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अनंत पवार, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे क्षेत्रिय व्यवस्थापक कुलदीप शिरपुरकर,

जिल्हा प्रमुख डॉ. पंकज दाभाडे, जिल्हा प्रमुख डॉ. विपुल चोपडा, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. संकीत साकल तसेच कोविड साथरोगाच्या उपचारात समावेश असणारे शासकीय, निम शासकीय, खासगी रुग्णालये तसेच धर्मदाय संस्था, वैद्यकिय महाविद्यालय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com