
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे त्वरित पंचनामे करावे,अशा सूचना खासदार डॉ. भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
अवकाळी पावसाने थैमान घातले असून नाशिक जिल्ह्यातील सुमारे साडे तीन हजार हेक्टर द्राक्षबागांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे . अतिशय उत्तम निर्यातक्षम दर्जाचे द्राक्ष उत्पादित झाले असतांना ह्या आस्मानी संकटामुळे द्राक्षबागा तसेच कांदा,गहू व इतर पिके उध्वस्त होऊन संपूर्ण पिकांची नासाडी झाली असल्याने त्यांचे रीतसर पंचनामे करण्याच्या सूचना खा. डॉ पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
निफाड, दिंडोरी तालुक्यातील नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याची मागणी खा.डॉ. भारती पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
याप्रसंगी कृषी अधिकारी, संबंधित तलाठी निफाड भाजपा तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, दिंडोरी भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.