डॉक्टरांवरील हल्याच्या निषेधार्थ उद्या आयएमएचे आंदोलन

राष्ट्रीय स्तरावर कायदा करण्याची मागणी
डॉक्टरांवरील हल्याच्या निषेधार्थ उद्या आयएमएचे आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय पातळीवर कठोर कायदा करावा, तसेच डॉक्टरांवरील होणार्‍या हल्ल्यांच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या शुक्रवारी (दि.१८) काळ्या फिती बांधून आणि काळे मास्क लावून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक आयएमएचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनासीस यांनी पत्रकार परिषदेत दिली...

यावेळी डॉ. कविता गाडेकर, डॉ. विशाल पवार, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. अनिता भामरे, राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

डॉ. सोनासीस यावेळी म्हणाले, डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी शिक्षा झाल्याचे अद्याप दिसून आलेले नाही. कागदोपत्री कायदे असल्याने डॉक्टरांवर हल्ले करुनही कोणतीही शिक्षा होत नसल्याने अशा समाजविघातक वृत्तीचा आत्मविश्वास वाढतो.

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते कायम ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर हल्ला करणाऱ्यांना वेळीच शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर कठोर कायद्यासाठी भारतभर आयएमएकडून आंदोलन केले जाणार आहे.

नाशिक जिल्हयातून पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांना निवेदन पाठवले जाणार आहे. तसेच पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधींनादेखील याबाबत निवेदन देणार आहे. करोनाकाळात डॉक्टर त्यांचे घरदार सोडून काम करीत आहे.

गेल्या दोन आठवड्यात आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्यप्रदेश या ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत. महाराष्ट्रात दीड वर्षांत पंधरा हल्याच्या घट्ना घडल्या आहेत. उद्या होणाऱ्या विधायक आंदोलानतून विविध मागण्या केल्या जाणार आहेत.

त्यात डॉक्टरांवर हिंसाचार रोखण्यासाठीचा केंद्रीय कायदा पारीत करण्यात यावा. या कायद्याचा मसूदा संसदेमध्ये तयार आहे. गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपांमुळे कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे. तो तात्काळ पारीत करावा.

सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात. रुग्णालयाच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करण्यात यावे. तसेच हल्ले करणार्‍यांवर जलद न्यायालयात खटले सुरु करावे, अशा मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. हेमंत सोनासीस यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com