
लखमापूर । राजेंद्र जाधव | Lakhmapur
राज्य सरकारने महिलादिनी महिला वर्गासाठी मोठी भेट दिली आहे ती म्हणजे एसटी बस प्रवासात (ST Bus Travel) 50% सवलत देण्यात आली आहे.
त्या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रात महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. परंतु करोना (corona) काळात बस जवळपास दोन अडीच वर्ष बंद होत्या त्यामुळे अनेक बसेस नादुरुस्त परिस्थितीत आहे. ग्रामीण भागातील (rural area) अनेक रस्त्यावर एसटी बस (ST Bus) म्हणजे लालपरीचे बिघाड होणे म्हणजे बसप्रवासी वर्गासाठी डोके दुखणंच म्हणावे लागले.
त्यामुळे प्रवासी वर्गाचे होणारे हाल शब्दात वर्णन करणे म्हणजे अवघड होय. ग्रामीण भागातील रस्त्यावर डौलदार स्वरूपात फिरणारी लालपरी सध्या अनेक ठिकाणी रस्त्यावर, बंद पडलेल्या स्थितीत पाहायला मिळत असल्याने प्रवासी वर्गाची 'न घर का न घाट का' अशी सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. एसटी बसचा प्रवास पुर्वी नागरिक आनंदाने करीत असत. परंतु सध्या अनेक आगारांतील बस या जुन्या झालेल्या असल्याने या बस (bus) रस्त्यावरून प्रवास करतांना कुठेतरी मध्येच बिघाड बंद होतात व प्रवासी वर्गाला पर्यायाने दुसर्या वाहनांनी आपल्या नियोजित गावांला पोहचावे लागते.
त्यामुळे अनेकांच्या महत्त्वाचे कामे, विवाह, ड्युटी, यावर वेळेवर पोहचता येत नाही. नोकरदार, कामगार, विद्यार्थी, ग्रामीण भागातील मजूर कामांनिमित्ताने बाहेर पडत असतात. त्यामध्ये बहुतांशी कामगार बसचा प्रवास करण्यावर पसंती देतात. आनंदायी प्रवास म्हणून बसचा मोठ्या प्रमाणावर कामगारांचा प्रवास आहे. परंतु करोना कालखंडात बसचा प्रवास बंद झाल्यामुळे बहुतेक बस या विना प्रवास आगारांमध्ये जास्त कालखंडामध्ये जागेवर उभ्या होत्या.
त्यामुळे अनेक बसमधील मशीनमध्ये खराबी, टायर जिर्ण, वायरिंग समस्या या मागील कालखंडापासून भेडसावत आहे. रस्त्यावर बसमध्ये बिघाड झाला की सर्व प्रवासी खाली उतरतात. पर्यायी व्यवस्था म्हणून बस चालक व वाहक यांना दुसर्या बसला हात दाखवून उभे करून प्रवासी वर्गाची पुढील प्रवासांची सोय करावी लागते. बसमध्ये प्रवासी वर्गाची संख्या ठराविक केलेली असल्याने काही प्रवासांना जागा न मिळाल्याने रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागते.
त्यामुळे अर्धादिवस हजेरी वर समाधान मानावे लागते.सध्या बहुतेक ठिकाणी अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने बसमध्ये रस्त्यावर बिघाड झाल्यास प्रवासी वर्गाला जीवमुठीत घेऊन रस्त्यांच्या कडेला उभे राहावे लागते. मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागतो. तेव्हा आगारांतुन बस प्रवासांला निघण्यापूर्वी तिचे संपूर्ण परिक्षण करून ती बस प्रवासांसाठी सज्ज करावी. ही मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे.