Video : 'रेमडेसिवीर'च्या गैरवापराबाबत ६८ रुग्णालयांना बजावल्या नोटीसा
रेमडेसिवीर

Video : 'रेमडेसिवीर'च्या गैरवापराबाबत ६८ रुग्णालयांना बजावल्या नोटीसा

जिल्हाधिकारी : खुलासा करण्याचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

रुग्णालयांकडून होत असलेल्या रेमडिसिव्हरच्या गैरवापराबाबत जिल्हाप्रशास अॅक्शनमोडमध्ये आले असून शहरातील ६८ रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जादा रेमडिसिव्हरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. समाधानकारक उत्तर नसल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले...

मागील काही दिवसांपासून रेमडिसिव्हर मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत अाहे. जिल्हाप्रशासनाने सर्व रुग्णालयांना १३ एप्रिलला प्राप्त रेमडिसिव्हर व त्याचा वापर याची यादी जपून ठेवण्यास सांगितले होते. रेमडिसिव्हर तुटवड्याच्या तक्रारीनंतर जिल्हाप्रशासनाने मागील आठ दिवसांपासून रुग्णालयाचा इंजेक्शन डाटा तपासण्याचे काम हाती घेतले आहे.

त्यात ३२५ पैकी २९४ रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली असून ६८ रुग्णालये रेमडिसिव्हरचा अनावश्यक वापर करत असल्याचे उघड झाले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या आदर्श प्रमाणापेक्षा इंजेक्शन वापराचा अतिरेक होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय इंजेक्शन हे रुग्णालयांनी रुग्णांना उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.

मात्र काही रुग्णालये इंजेक्शन मिळविण्याची जबाबदारी रुग्णांची असल्याचे सांगत अतिशय चुकीचा पायंडा पाडत आहे. त्यामुळे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांची फरफट होत आहे. १० एप्रिलच्या पत्रानूसार रुग्णालयांनी इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.

शेडयुल 'ए' नूसार रुग्णालये स्वत: रेमडिसिव्हर खरेदी करु शकतात. तसेच जिल्हाप्रशासनाकडून केंद्रिय पध्दतिने त्यांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिले जात आहे. अनावश्यकपणे प्रत्येक रुग्णाला रेमडिसिव्हर लिहून देणे थांबवले तर रेमडिसिव्हरचा तुटवडा कमी होऊन रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ कमी होईल,असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com