साल्हेर किल्ला परिसरात अवैध वृक्षतोड

साल्हेर किल्ला परिसरात अवैध वृक्षतोड

मुंजवाड । Munjwad

बागलाण तालूक्यातील पाश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण राहीलेल्या साल्हेर किल्ला परिसरात वनसंपदेची मोठया प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ला परिसर दिवसेंदिवस उजाड होत असून भकास दिसत आहे.

साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी वन विभागाचे कार्यालय असून या ठिकाणी पर्यटकांसाठी विश्रामगृहास निसर्ग परिचय केंद्रही वन विभागाने उभारले आहे. असे असूनही या परिसरातील वनराई चोरटया मार्गाने नामशेष करण्याचा प्रयत्न होत असतांना वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये तसेच निसर्गप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

साल्हेर किल्ल्याच्या परिसराचा विकास व्हावा पर्यटकांची वर्दळ वाढून या परिसरातील नागरीकांना रोजगार मिळावा यासाठी आ. दिलीप बोरसे यांनी भव्य शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प केला आहे.

तत्पूर्वीच या परिसरातील जंगलाची छुपी वृक्षतोड होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी भवानी मातेचे पुरातन मंदिर असून या परिसरात त्या काळी असलेल्या वसाहतीचे अवशेष भग्नावस्थेत त्याची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत आहेत.

येथील भवानी माता ही पवार कुळाची कुलदैवत असून तीच्या दर्शनासाठी मोठया प्रमाणात भावीक येथे हजेरी लावतात. जून्या वसाहतीच्या घरांमध्ये आज मोठमोठी आंबा, चिंच, जांभूळ, सादडा तसेच करवंदीच्या जाळी वाढल्या आहेत. या जाळींमध्ये घरांचे अवशेष, पाण्याची विहीर, दळण दळण्याचे जाते नजरेस पडतात. या परिसरातील आंबे दिल्लीच्या बादशाहास खास नजराना म्हणून पाठवला जात असे.

आजही किल्ल्याच्या पायथ्याशी अवाढव्य अशी आम्र वृक्षाची झाडे पहावयास मिळतात. परंतू चोरट्या वृक्षतोडीमुळे या भागातील वनसंपदा वन विभागाच्या अनास्थेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दोन राज्यांच्या सिमेवर असलेला हा दुर्गम भाग आहे. संपूर्ण आदिवासी परिसर असून स्वयंपाकासाठी लाकडी सरपणाचा उपयोग मोठया प्रमाणात होत असल्यामुळेही वृक्षतोड नेहमीचीच झाली आहे.

सरपणासाठी या भागातील रहिवाशांना गॅस शासनाकडून मोफत वाटप करण्यात आले. त्याचा वापर होतो की नाही याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. वनविभागाने वेळीच लक्ष घालून ही वनसंपदा वाचवण्याची मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

ऐतिहासीक असलेल्या साल्हेर, मुल्हेर किल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पुरातन वृक्ष असून या वृक्षांची अशीच चोरटी लुट होत राहील्यास हा परिसर बोडका होण्यास वेळ लागणार नाही.

हा वारसा जपण्यासाठी स्थानिक रहिवाशांसह वन विभागाची जबाबदारी आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे नगरसेवक राहूल पाटील यांनी दिला आहे.

साल्हेर किल्याच्या पायथ्याशी होणारी वृक्षतोड हा संतापजनक प्रकार असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यावर आळा घालण्यात येईल.

आ. दिलीप बोरसे यांच्या प्रयत्नातून पन्नास एकरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला असून त्याचे कामही लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. शिवसृष्टी निर्माण झाल्यास येथील वृक्षतोडीलाही आळा बसेल.

- बिंदू शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान सेल

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com