नवीन नाशिक | निशिकांत पाटील

दत्त चौक येथील महावितरणाच्या आवारातील वृक्षांची छाटणीची परवानगी घेऊन चक्क वृक्षाची कत्तल करण्याचा प्रकार घडल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत...

दत्त चौक येथे असलेल्या महावितरणच्या कार्यालयाच्या मागील जागेत मोठ्या प्रमाणात गाजर गवताचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून येथील गवत काढण्यासोबतच येथील चार बाभूळचे वृक्ष विस्तार कमी करणे व छाटणी करण्याची परवानगी मनपा वृक्ष प्राधिकरण समितीने दिली.

मात्र, प्रत्यक्षात येथील वृक्ष पूर्णतः तोडल्याचा अजब प्रकार घडल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. येथील वृक्ष तोडीचा प्रकार हा महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच झाला.

मात्र, या घटनेचे त्यांनी गांभीर्य न दाखविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वास्तविक पाहता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष छाटणीची परवानगी दिल्यानंतर ही छाटणी योग्य रितीने झाली कि नाही याची चौकशी करणे गरजेचे असतांना प्रत्यक्षात तसे होत नसल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

याठिकाणी झाडाची उंची कमी करणे व छाटणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, जर येथे वृक्ष तोड झाली असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
प्रशांत परब उद्यान निरीक्षक ,नवीन नाशिक

नवीन नाशकात सर्रास पणे वृक्ष तोड करणे हे नेहमीचेच झाले आहे . मनपाने या संदर्भात चौकशी करून कारवाई न केल्यास पर्यावर प्रेमींकडून आंदोलन छेडण्यात येईल.
ऍड. मनोज आहेर, पर्यावरण प्रेमी