नाशिक । Nashik

त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक विधीसाठी चार दिवस भाविक राहात असल्याने लॉजिंग बोर्डींगच्या व्यावसायाला सुगिचे दिवस आले आहेत. मात्र यातूनच पुढे अनैतिक व्यवसाय तसेच दारूचे धंदे फोफावू लागल्याने या पौराणिक नगरीचे पावित्र्याला धक्का बसत आहे. याबाबत भाविक तसेच नागरीकही नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र गुन्हेगार व धनदांडग्यांच्या दहशतीमुळे नागरीकांना सर्व निमुट सहन करावे लागत आहे.

त्र्यंबेश्वर शहरात चार अधिकृत मद्याची दुकाने व बिअरबार असून ते बहूतांश नगरसेवकांची असल्याचे नागरीक सांगतात. त्र्यंबेश्वरला येणारे भाविक हे भक्तीभावाने येत असतात. परंतु त्यांचे स्वागतच बिअरबार व अवैध व्यावसायांनी होते. तर दुसर्या मार्गावर मटन- मच्छीची दुकाने भाविकांच्या स्वागताला आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आणि त्र्यंबक शहरातील काही लॉजिंगमध्ये जोडप्यांसाठी खास सुविधा पुरविण्यात येतात. त्यामुळे नाशिक- त्र्यंबक रस्ता बदनाम झाला आहे. यासह काही लॉजवर जुगारही खेळला जातो. तसेच काही हॉटेल आणि धाबे हे अवैध दारू विक्रीची केंद्र झाली आहेत. अशा ठिकाणी ड्राय डे लादेखील मद्य उपलब्ध असते. त्यामुळे या सर्व अवैध व्यवसायाला चाप लावावा, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

त्र्यंबकेश्वर शहर-परिसरात लॉजिंग-बोर्डिंगवर चालणारे अवैध व्यवसाय, नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील ढाबे आणि तसेच हॉटेल-धाब्यांवर होणारी सर्वप्रकारची दारू विक्री बंद करण्यात यावी या मागणीसाठी वर्षभरापुर्वीच तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधींनी एकत्र येत त्र्यंबकेश्वरचे पोलिस उप-अधीक्षक व तहसील यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. याचे पुढे काय झाले असे प्रश्न संतप्त नागरीक उपस्थित करत आहेत.

शहर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, ज्येष्ठ नेते मधुकरराव लांडे, बाजार समिती उपसभापती युवराज कोठुळे, शिवसेनेचे समाधान बोडके, निवृत्ती लांबे, संपत चव्हाण, भूषण अडसरे, मालू कडाळी, अंजनेरीचे पंडित चव्हाण, मनसेनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ कोठुळे यांनी विविध अवैध व्यावसायांबाबत सातत्याने तक्रारी मांडल्या आहेत.

तसेच शहराचे पावित्र कायम रहावे, तरूण पिढी बरबाद होऊ नये यासाठी महिला पुढे येत असून मद्यासाठी लढा उभारण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. तालुक्याच्या हद्दीत असलेल्या नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील काही लॉजिंगमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याने, त्या बंद कराव्यात अशी मागणी सातत्याने होत आहे. पोलीसांची दिखाव्यासाठी कारवाई होते मात्र काही दिवसातच पहिले पाढे पंच्चावन्न प्रमाणे हे अवैध व्यावसाय सर्रास सुरू आहेत.

नगरसेवकांचे मद्यधंदे

धार्मिक त्र्यंबकनगरीचे पावित्र भंग करण्यात नगरसेवकच आघाडीवर असल्याचे आढळते. शहरात 4 मद्याची दुकाने असून चारही नगरसेवकांची आहेत. यामध्ये एका नगरसेविका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पतीचा बिअरबार त्र्यंबगनगरीत प्रवेशाच्या ठिकाणी आहे.

कुशावर्त तीर्थाकडे जाणार्या मार्गावर भाजी मंडईच्या बाजुलाच नगरसेविकेच्या सासर्याचे देशी दारूचे दुकान आहे. तसेच इतर दोन नगरसेवकांचेही बिअरबार शहरात आहेत. बाह्य बसस्थानकाच्या समोर गजानन महाराज देवस्थानच्या प्रवेशद्वारावर एक बार असून त्याने गजानन माहराज मंदिर झाकोळले आहे. ज्या धार्मिक नगरीच्या जीवावर ते मोठे झाले त्याच नगरीचे पावित्र भंग करण्याचे पापही हेच नगरसेवक करत असल्याचे नागरीक बोलत आहेत.