पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार

पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार

नवीन नाशिक | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक 27 मध्ये मुख्य रस्ता सोडून दुसऱ्याच रस्त्यावर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पाणीपुरवठा विभागाचे काम सुरू असल्याचा प्रकार नवीन नाशिक प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे यांनी उघडकीस आणला....

पाथर्डी फाटा स्टेट बँक चौक या परिसरामध्ये सर्विस रोड लगत पिण्याच्या पाण्याच्या जल वाहिनीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, सदर जलवाहिनीचे काम सर्व्हिस रोड लगत करण्यात येणार होते, परंतु पाणीपुरवठा विभागाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदाराने नियोजित रस्ता सोडून त्याच्या आतील म्हणजे अश्विन नगर परिसरातून कॉलनी रस्त्यावर काम सुरू केले.

दरम्यान, हा प्रकार प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे यांच्या लक्षात आला. त्यांनी सदर ठेकेदाराला या कामाची परवानगी तसेच बांधकाम विभागाची रस्ता तोडण्याची परवानगी आहे का? अशी विचारणा केली असता, कुठलेही काम करण्यासाठी इतर विभागाची परवानगीची आम्हाला गरज नसते असे सांगत उडवाउडवीचे उत्तरे खाडे यांना देण्यात आली.

या प्रकारावरून खाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर काम हे बेकायदेशीर रित्या सुरू असल्याचे उघडकीस आणले व सदर काम बंद करण्यात आले. दरम्यान याठिकाणी रस्ता काही प्रमाणात खोदला गेला होता त्याठिकाणी बीएसएनएलच्या वायर तोडून नुकसान देखील करण्यात आले.

संबंधीत ठेकेदारावर मनपाने कारवाई करून बेकायदेशीर काम केल्याबद्दल गुन्हे दाखल करावे, याविषयी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

चंद्रकांत खाडे, नवीन नाशिक प्रभाग सभापती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com