ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन; ठेकेदाराला दीड कोटींचा दंड

ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन; ठेकेदाराला दीड कोटींचा दंड
USER

नाशिक । प्रतिनिधी

गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी डोंगराचे अवैधरित्या उत्खनन करणार्‍या ठेकेदाराला जिल्हा प्रशासनाने दीड कोटींचा दंड ठोठावला आहे. संबंधित ठेकेदाराने दोन हजार ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केले होते. याबाबतची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली.

दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरी पर्वत आहे. पर्यावरण व जैवविविधतेच्या दृष्टीने हा डोंगर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र गौण खनिज चोरट्यांची वक्रदृष्टी या डोंगरावर अनेक वर्षांपासून आहे. तीन दिवसांपूर्वी गौण खनिज चोरट्याकडून दिवसाढवळ्या जेसीबीने हा डोंगर पोखरण्याचे काम सुरू झाले होते.

स्थानिकांनी व पर्यावरणप्रेमींनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला, तेव्हा कुठे जिल्हा प्रशासनाला जाग आली. प्रांत व तहसीलदारांनी तत्काळ पथक पाठवत या चोरट्यावर कारवाई करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच त्याचा जेसीबी जप्त केला.

या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार अवैध उत्खनन प्रकरणी दीड कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. थेट ठाकरे यांनीच लक्ष घातल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com