घोटी । जाकीरशेख Ghoti

इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सात जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवशी सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे.

संपूर्ण टिटोली गावाने संघटीत होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडीची ही हँट्रिक आहे. तिसऱ्यांदा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थांनी संघटीतपणे पुढाकार घेतला.

इगतपुरी तालुक्यात वर्षाच्या सुरुवातीलाच आठ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असल्याने त्या गावांत चुरस लागल्या आहेत. त्यात टिटोली गावाने आदर्श निर्माण करून बिनविरोध ग्रामपंचायत निवडीची हँट्रिक केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. ही आदर्श परंपरा यावेळीही कायम ठेवण्यात आल्याने तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी एकूण सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले प्रभाग क्र १ मधून अनुसूचित जमाती गटातून सौ कोमल दशरथ हाडप तर ओबीसी स्त्री राखीव गटातून सौ ज्योतिबाई काळु बोंडे, प्रभाग क्र. २ मधून अनुसूचित जमाती गटातून भरत बापूराव गभाले तर अनु. जमाती महिला राखीव गटातून सौ लक्ष्मी प्रभाकर गभाले तर प्रभाग क्र. ३ मधून सर्वसाधारण गटातून अनिल तुळशीराम भोपे, अनु. जमाती महिला राखीव गटातून सौ काजल भरत गभाले तर सर्वसाधारण महिला राखीव गटातून सौ माया संदीप भडांगे यांचे अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

गावाची बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्यासाठी गावातील आजीमाजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक कार्यकर्ते आदींनी समन्वयातून पुढाकार घेतला. दरम्यान बिनविरोध निवडणूक झालेल्या टिटोली गावाच्या विकासासाठी आ हिरामण खोसकर यांच्या आमदार निधीतून भरीव निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी दिल्याची माहिती नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अनिल भोपे यांनी दिली.