निराधार महिलांना ‘परमेश्वर’ प्रसन्न

निराधार महिलांना ‘परमेश्वर’ प्रसन्न
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या (Corona) थैमानात कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या विधवा महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावून त्यांना हक्काचा रोजगार उभा करण्यासाठी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे (Parmeshwar Kasule) यांनी स्वेच्छेने व समाजातील दानशूरांच्या माध्यमातून महिलांना (Womens) मदत होईल. यासाठी प्रयत्न केल्यानेे महिलांना देवमामलेदार पावल्याचे समाधान मिळत आहे. कासुळे यांंनीही आपले परमेश्वर नाव सार्थक केले आहे...

सध्या अनेक विधवा महिला कुटुंबातील लहान लेकारांना घेऊन तहसील परिसरात मदतीकरिता हेलपाट्या घालताना दिसतात. अपुरे शिक्षण, शासन योजनांच्या माहितीचा अभाव यामुळे शासनाच्या विविध लाभांच्या योजनापासून ही त्यांना वंचित राहावे लागते. इगतपुरीसारखा दुर्गम भाग व त्यातच आदिवासी वाडे-पाडेतील अनेक कुटुंबे मदत मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहेत.

तहसील कार्यालयात आठवड्यातून एकदा शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी, माहिती, यांच्यासह गरजूंना मदत होईल यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींना आमंत्रित करत समाजातील गरजूंना मदत व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आपल्या सहकार्‍यांसमवेत कासुळे स्वतःला झोकून देत आहेत.

महिलांनी समाजात वावरताना आपला हक्काचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी व्यवसायिक क्षेत्रात करिअर उभे करण्याचा मानस आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना देखील अनेक गावे-वस्त्यांमध्ये जाऊन गरजू कुटुंबे यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

महिला बालकल्याण विभागाचे (Department of Women and Child Welfare) सहकार्य मिळत आहे. सात बारावर वारस हक्क, नवीन दुय्यम शिधापत्रिका, संजय गांधी योजना, समाज कल्याण बालसंगोपन, गृहउद्योग यासाठी माहिती दिली जात असून मदत केली जात आहे. कोणत्याही प्रकारे वंचित राहू नये यासाठी आठवड्यातून एकदा तहसील कार्यालयात बैठक होत आहे.

समाजातील वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला काम करावयाचे आहे. सेवा, अर्थ, वास्तू रूपाने आपण आपल्या माता- भगिनींना सहकार्य करून आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन परमेश्वर कासुळे यानी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com