घोटी l Ghoti (प्रतिनिधी)

इगतपुरी तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण येत्या २८ जानेवारीला निश्चित होणार आहे. या सरपंच पदांच्या आरक्षणाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, इगतपुरी तालुक्यात नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीं पैकी भरविर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर या तीन ग्रामपंचायतींचे सरपंच पद नव्या आरक्षणांनुसार होणार आहे. त्यामुळे शेणवड खुर्द, भरवीर खुर्द व गरुडेश्वर पंचायतीत सरपंच पदाची लॉटरी कुणाला लागणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

इगतपुरी तालुक्यात २०२० ते २०२५ या मुदतीसाठी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र वगळता उर्वरित ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी येत्या २८ जानेवारीला पंचायत समिती सभागृहात बैठक होणार असून त्यात आरक्षण निश्चित होणार आहे.

इगतपुरी तालुक्यात एकूण ९६ ग्रामपंचायती असून ६४ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रात आहेत तर उर्वरित ३२ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्राबाहेरील आहेत. या अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित होणार आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी,ओबीसी, सर्वसाधारण अशा प्रवर्गासाठी आरक्षण निघणार आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती व अन्य संस्थांच्या निवडणुका असल्याने सरपंच पदांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या ग्रामपंचायतीत सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, आरक्षणानुसार सरपंच पद कोणाकडे जाणार याबाबत अंदाज बांधले जात आहे.

इगतपुरी तालुक्यात सध्या निवडणुका झालेल्या भरवीर खुर्द, शेणवड खुर्द व गरुडेश्वर ग्रामपंचायतीत नव्या आरक्षणानुसार सरपंच निवड होणार असल्याने या तीन पंचायतीत सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे उत्कंठा लागून राहिली आहे.

या ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरणार

वाडीव-हे, गोंदे दुमाला माणिकखांब, मुंढेगाव, मुकणे, नांदूरवैद्य, साकुर, सांजेगाव, मुरंबी, भरवीर बु., कुर्हेगाव शेनीत, वाघेरे, मोडाळे, नांदगाव बु समनेरे, कावनई भरवीर खुर्द बेलगाव कुर्हे, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द, दौंडत, मालूजे, जानोरी, शिरसाठे, पाडळी, निनावी, पिंपळगाव घाडगा, लक्ष्मीनगर, कृष्णानगर, गरुडेश्वर, शेनवड खुर्द.